विजय हजारे चषक : अर्जुन तेंडुलकरचा प्रभावी मारा, सुयश प्रभूदेसाई सामनावीर
जयपूर : शनिवारपासून सुरू झालेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत गोव्याच्या संघाने विजयी सलामी दिली. गोव्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ओडिशाचा २७ धावांनी पराभव केला. जयपूरच्या डॉ. सोनी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने अप्रतिम कामगिरी केली. अर्जुन तेंडुलकरने गोव्याच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान अर्जुन तेंडुलकरला टूर्नामेंटच्या मध्येच संघातून वगळण्यात आले होते. पण आता त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दमदार कमबॅक केले.
गोव्याची ५० षटकांत ३७१ धावांची मजल
सामन्यात गोव्याने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. यावेळी गोव्याच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत ५० षटकांत ४ गडी गमावून ३७१ धावा केल्या. गोव्यातर्फे इशान गडेकरने सर्वाधिक ९३ धावांची खेळी खेळली. तर कर्णधार दर्शन मिसाळने ७९ आणि सुयश प्रभुदेसाईने केवळ २२ चेंडूत ७४ धावांचे योगदान दिले. स्नेहल कवठणकरनेही ६७ धावा केल्या. ओडिशा संघातर्फे अभिषेक राऊतने ४५ धावांत २, तर तरानी साने ५९ धावांत १ गडी बाद केला. या डावात अर्जुन तेंडुलकरला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण लक्ष्याचा बचाव करताना तो आपल्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
ओडिशा संघानेही गोव्याच्या संघाला चांगले प्रत्युत्तर दिले. स्वस्तीक समल आणि गौरव चौधरीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या गड्यासाठी १०७ धावांची भागिदारी केली. स्वस्तीक समलने ४६ चेंडूत ५७ धावा केल्या. दीपराज गावकरने त्याला त्रिफळाचीत केले. दुसरा सलामीवीर गौरव चौधरीने ६७ चेंडूत ७८ धावा केल्या. तो मोहित रेडकरचा शिकार ठरला. मोहितने त्याला पायचित केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार संदीप पटनाईकने ७१ चेंडूत ७३ धावा केल्या. तो धावचित झाला. कार्तिक बिस्वालने ४९ तर आशीर्वाद स्वैनने ५३ धावांचे योगदान दिले.
अर्जुनचा प्रभावी मारा, फलंदाज हैराण
एकवेळ अशी होती ज्यावेळी वाटत होते की ओडिशा हा सामना आरामात जिंकणार. पण गोव्यासाठी अर्जुन तेंडुलकरने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. त्याने एका पाठोपाठ एक ३ फलंदाजांना तंबूत पाठवून आणि सामना पलटवला. अर्जुन तेंडुलकरने १० षटकांत ६.१० च्या इकॉनॉमी रेटने ६१ धावा दिल्या आणि एकूण ३ बळी घेतले. त्याने सेट झालेल्या कार्तिक बिस्वाल, अभिषेक राऊत आणि राजेश मोहंती यांना बाद केले. त्यामुळे गोव्याचा विजय निश्चित झाला. अर्जुनशिवाय शुभम तारीने ७४ धावांत २ आणि मोहित रेडकरने ४७ धावांत २ गडी बाद केले. दीपराज गावकरने २३ धावांत १ गडी बाद केला. केवळ २२ चेंडूत ७४ धावा करणाऱ्या सुयश प्रभू देसाईला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अर्जुन फ्लॉप
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्याला एकूण ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या सामन्यांमध्ये तो फक्त १ बळी घेऊ शकला आणि त्यानंतर तो संघाबाहेर गेला. यानंतर अर्जुन तेंडुलकर दुबईत काही काळ होता. पण आता त्याने दमदार कमबॅक केला आहे.
संक्षिप्त धावफलक
गोवा : ४ बाद ३७१, स्नेहल कवठणकर ६७ (८१), इशान गडेकर ९३ (९६), दर्शन मिशाळ ७९ (५६), सुयश प्रभूदेशाई ७४ (२२). गोलंदाजी : अभिषेक राऊत ६-०-४५-२, तरानी सा ९-०-५९-१.
ओडिशा : सर्वबाद ३४४, स्वस्तीक समल ५७ (४६), गौरव चौधरी ७८ (६७), संदीप पटनाईक ७३ (७१). गोलंदाजी : अर्जुन तेंडुलकर १०-०-६१-३, शुभम तारी १०-०-७४-२, मोहित रेडकर ७-०-४७-२.