लिसांड्रा रॉड्रिग्ज उत्कृष्ट गोलरक्षक : फेअर प्ले पुरस्कारही गोव्याला
पणजी : गोवा विद्यापीठाने पश्चिम विभाग अखिल भारत आंतरविद्यापीठ महिलांच्या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन वर्धमान महावीर खुले विद्यापीठ, कोटा येथे करण्यात आले होते.
प्लेऑफमध्ये झालेल्या गट ‘ए’मधील सामन्यात गोवा विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा ४-१ गोलने पराभव केला. कॅरेन एस्ट्रोसिओने हॅटट्रिक केली आणि सुष्मिता यादवने ४-१ गोलसह वर्चस्व गाजवत गोवा विद्यापीठाला अखिल भारत आंतरविद्यापीठ चॅम्पियनशिप २०२३-२४च्या अंतिम फेरीत नेले. सामनावीराचा पुरस्कार कॅरेन एस्ट्रोसिओला देण्यात आला.
पश्चिम विभागीय लीगमध्ये गोवा विद्यापीठाने पहिल्या साखळी सामन्यात हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ (एचएनजीयू) गुजरात विरुद्ध ३-० असा विजय मिळवला. गोवा विद्यापीठाकडून कॅरेन एस्ट्रोसिओ, ब्लेसिका रॉड्रिग्ज आणि रिझेला आल्मेडा यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामनावीराचा पुरस्कार आरोशी गोवेकरला देण्यात आला. त्यांच्या दुसऱ्या सामन्यात गोवा विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाचा २-० गोलने पराभव केला. कॅरेन एस्ट्रोसिओ आणि आरोशी गोवेकर यांनी गोल केले. सामनावीराचा पुरस्कार वनिषा वाझला देण्यात आला.
अखेरच्या सामन्यात गोव्याचा २-०ने विजय
चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात गोवा विद्यापीठाने लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वाल्हेरवर २-० असा पराभव केला. एनिएला बार्रेटो आणि रिझेला आल्मेडा यांनी प्रत्येकी दोन गोल केले. सामनावीराचा पुरस्कार रिझेला आल्मेडाला देण्यात आला. गोवा विद्यापीठाने दोन वैयक्तिक चॅम्पियनशिपचे पारितोषिक पटकावले. चॅम्पियनशिपमधील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार लिसांड्रा रॉड्रिग्जला आणि सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड खेळाडूचा पुरस्कार एनिएला बार्रेटोला देण्यात आला. गोवा विद्यापीठाने चॅम्पियनशिपचा फेअर प्ले पुरस्कारही जिंकला.