बॉर्डर-गावसकर चषक : ट्रॅव्हिस हेड सामनावीर, बुमराहचे ९ बळी
ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेन येथील गाबा येथे खेळवण्यात आला. सामन्याच्या पाचही दिवसांवर पावसाचे सावट होते.
पाचव्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी २७५ धावांचे लक्ष्य होते, जेव्हा टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद ८ धावा होती तेव्हा पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे गाबा टेस्ट रद्द करण्यात आली. सध्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात बुमराहने एकूण ९ विकेट घेतल्या. १५२ धावांच्या खेळीसाठी ट्रॅव्हिस हेडला सामनावीर घोषित करण्यात आले. मालिकेतील पुढील सामना म्हणजेच चौथी लढत २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे होईल.
१२ वर्षांनंतर गाबामध्ये कसोटी अनिर्णित
नोव्हेंबर २०१२ नंतर ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच कसोटी अनिर्णित राहिली. यापूर्वी नोव्हेंबर २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली गेलेली कसोटी अनिर्णित राहिली होती. त्या आणि या कसोटी सामन्यादरम्यान ११ कसोटी सामने झाले आणि त्या सर्व सामन्याचा निकाल लागला.
भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ७ बाद ८९ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील १८५ धावांच्या आघाडीसह भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या होत्या. मात्र, यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे पुढील खेळ रोखला गेला. त्यानंतर दोन्ही कर्णधाराच्या सहमतीने पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला.
भारताने बुधवारी ९ बाद २५२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि बुधवारी सकाळी २६० धावांपर्यंत मजल मारली. आकाश दीप ३१ धावा करून बाद झाला. यानंतर पावसामुळे सुमारे दोन तास खेळ खंडित झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला तेव्हा त्याला धावा काढण्याची घाई झालेली दिसून आली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाने ३३ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या.
बुमराहने उस्मान ख्वाजा (८) आणि मार्नस लबुशेन (१) यांना बाद केले. यानंतर आकाश दीपने नॅथन मॅकस्विनी (४) आणि मिचेल मार्श (२) यांना बाद केले. सिराजने स्टीव्ह स्मिथला (४) बाद करून निम्मा ऑस्ट्रेलियन संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. ट्रॅव्हिस हेड आणि ॲलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. सिराजने हेडला यष्टिरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याला १७ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाला ८५ धावांवर कमिन्सच्या रूपाने सातवा धक्का बसला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियने दुसरा डाव ८९ धावांवर घोषित केला. कॅरी २० धावा केल्यानंतर तर स्टार्क दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताकडून दुसऱ्या डावात बुमराहने तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी सिराज आणि आकाशने प्रत्येकी दोन गडी बाद केले.