तिसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस ठरला खलनायक

बॉर्डर-गावसकर चषक : भारतीय संघाची अवस्था बिकट

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th December, 12:06 am
तिसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस ठरला खलनायक

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला. या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ १३.२ षटकांचाच खेळ होऊ शकला होता. आता पुन्हा तिसऱ्या दिवशी पावसामुळे केवळ ३३.१ षटकांचाच खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या.
गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे सुमारे आठ वेळा खेळ थांबवण्यात आला. पाऊस थांबून-थांबून पुन्हा पुन्हा येतच होता. शेवटी त्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. पुढच्या दोन दिवसांतही असेच काहीसे घडू शकते, कारण पुढील दोन दिवस ब्रिस्बेनमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांच्या अंदाजानुसार ब्रिस्बेन कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची १०० टक्के आणि ८९ टक्के शक्यता आहे.
तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला रविवारच्या धावसंख्येमध्ये अधिक धावा करता आल्या नाहीत. यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८८ चेंडूत ७० धावा करून तो बाद झाला. त्याने ७ चौकार आणि २ षटकार खेचले. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ४४५ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. यंदा प्रथमच कांगारू संघ ४०० धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. तर सिराजने २, आकाशदीप अन् नितेश रेड्डीने प्रत्येकी १ विकेट घेतली. मिचेल स्टार्कला (१८) बुमराहने तर नॅथन लायनला (२) सिराजने बाद केले. त्याचवेळी आकाश दीपने कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने रविवारच्या ७ बाद ४०५ धावसंख्येवरून पुढे खेळताना आणखी ४० धावा जोडल्या आणि उर्वरित तीन विकेट गमावल्या. रविवारी ट्रॅव्हिस हेड (१५२) आणि स्टीव्ह स्मिथ (१०१) यांनी शानदार शैलीत शतके झळकावून ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता.
भारतीय फलंदाज पुन्हा ठरले फ्लॉप
भारत सध्या ऑस्ट्रेलियाच्या ३९४ धावांनी मागे आहे आणि फक्त सहा विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत टीम इंडियासमोर फॉलोऑन वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भारतीय डावात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असताना पावसामुळे अनेकवेळा खेळ थांबवण्यात आला. भारतीय डावाच्या दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला (४) मिचेल मार्शकरवी शॉर्ट मिडविकेटवर झेलबाद केले. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या पुढच्याच षटकात शुभमन गिल (१) हाही स्लिपमध्ये मार्शकडे झेलबाद झाला, तर हेझलवूडने उपाहारापूर्वी विराट कोहलीला (३) यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेलबाद करून भारताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर लगेचच ४४ धावसंख्येवर कमिन्सने पंतला (९) यष्टिरक्षक कॅरीकडे झेलबाद करून भारताला चौथा धक्का दिला. त्यानंतर काही वेळ पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि नंतर चहापानाचा ब्रेक घेण्यात आला. यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा तीन षटकेही पूर्ण होऊ शकली नाहीत आणि पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसामुळे पुन्हा सामना होऊ शकला नाही आणि पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ३३ धावांवर नाबाद परतला तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडलेले नव्हते.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत फक्त दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, भारत आणि ऑस्ट्रेलिया उरले आहेत. सध्या दक्षिण आफ्रिका ६३.३३ टक्के गुणांसह अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ६०.७१ टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून टीम इंडिया ५७.२९ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर टीम इंडिया गाबा कसोटी हरली तर तिसऱ्या क्रमांकावर राहिल पण गुण मात्र कमी होतील.टीम इंडियाने यानंतर मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे गुण ५८.८ टक्के आणि ऑस्ट्रेलियाचे गुण ५७ टक्के होतील. त्यानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर येईल. भारतीय संघाला इतर कोणत्याही संघावर अवलंबून न राहता थेट डब्ल्यूटीसी २०२५ ची अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना गाबा कसोटी जिंकावी लागेल आणि त्यानंतर मालिकेतील उर्वरित दोन सामनेही जिंकावे लागतील. पण सध्या पावसाची हजेरी आणि भारतीय संघाची अवस्था पाहता गाबा कसोटीत विजय मिळवणे शक्य नसणार आहे.
भारतासाठी डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण

भारतीय संघाने जर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी १-३ किंवा १-४ ने गमावली तर ते डब्ल्यूटीसी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल आणि ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. जर मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली तर टीम इंडियाला डब्ल्यूटीसी मध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला आश्चर्यकारक कामगिरी करावी लागेल.श्रीलंकेला मायदेशात दोन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर निर्भेळ मालिका विजय मिळवावा लागणार आहे. याशिवाय आणखी एक समीकरण म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत जर ऑस्ट्रेलियाने ३-२ असा विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध मायदेशातील दोन्ही कसोटी सामने गमवावे लागतील, तर टीम इंडियाला संधी मिळेल. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील किमान एक सामना अनिर्णित राहिला पाहिजे.
बुमराहवर जातीयवादी टीप्पणी
गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी क्रिकेटपटू आणि फॉक्स स्पोर्ट्सची समालोचक ईशा गुहा हिने जसप्रीत बुमराहवर जातीयवादी टीका केली. यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले, त्यामुळे आता या महिला समालोचकाने बुमराहची माफी मागितली आहे. ईशा गुहाने समालोचन करताना बुमराहसाठी प्राइमेट हा शब्द वापरला होता, ज्याचा अर्थ माकड असाही होतो. गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच ईशा गुहाने माफी मागितली. ती म्हणाली, रविवारी समालोचन करताना मी एक शब्द वापरला, ज्याचे अनेक अर्थ आहेत. सर्वप्रथम मी माफी मागते. जर मी काही चुकीचे बोलली किंवा कोणाला दुखावले असेल तर माफी मागते. मी सर्वांचा आदर करते, जर तुम्ही कॉमेंट्री संपूर्ण ऐकलीत तर तुमच्या लक्षात येईल की मी भारताच्या महान खेळाडूचे कौतुक करत होती.  पुढे म्हणाली, मी समानतेवर विश्वास ठेवते. मी फक्त बुमराहच्या यशाबद्दल आणि त्याच्या कामगिरीबद्दल बोलत होती. मी कदाचित त्यासाठी चुकीचा शब्द वापरला असेल, ज्यासाठी मी माफी मागते.ब्रेट लीने बुमराहचे कौतुक करत वक्तव्य केले होते. यावर ईशा गुहा म्हणाली की, ‘तो एमव्हीपी आहे, नाही का? सर्वात मौल्यवान प्राइमेट, जसप्रीत बुमराह.