पणजी : शनिवारी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मोर्चा नेणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजप सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. तर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला. मोर्चाला विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकोस्टा उपस्थित होते.
जमीन हडप, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, सुलेमान सिद्दिकी प्रकरण ,बेरोजगारी, नोकरी घोटाळा अशा विषयांवरून काँग्रेस पक्षाने शांतता पूर्ण मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चा काँग्रेस भवन वरून बांदोडकर रस्त्यावर फिरून पुन्हा पोलीस मुख्यालयाजवळ आला असता पोलिसांनी त्यांना अडवले. नंतर काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजपा विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी अमित पाटकर म्हणाले की, आम्ही शांतता पूर्ण मार्गाने मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी मोर्चा काढणार होतो. आम्ही सुलेमान खानचा, जमीन रूपांतराचा विषय काढणार असल्याने पोलिसांनी घाबरून आम्हाला परवानगी नाकारली आहे. भाजप दडपशाही करून विरोधी पक्षांचा आवाज दाबत आहे. पोलिसांच्या कोठडीतून देशभर १५ गुन्हे दाखल असलेला आरोपी कसा पळून जातो. मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर देणे आवश्यक आहे.
माणिकराव ठाकरे म्हणाले की, गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारचा आता केवळ जमीन रूपांतर आणि हडप करणे हेच हेतू राहिले आहेत. जमीन हडप प्रकरणी सरकार कुणाला तरी वाचवू पाहत आहे अशी शंका निर्माण झाली आहे. गोव्यासह अन्य भाजप सरकार असणाऱ्या राज्यांत दडपशाही सुरू आहे.