सासष्टीः कोलवा खाडीच्या प्रदूषणाला जबाबदार आस्थापनांवर कारवाई व्हावी- आमदार व्हेंझी

आमदार व्हेंझी यांची मागणी : खाडीनजीकचे स्वच्छतागृह बंद करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21 hours ago
सासष्टीः कोलवा खाडीच्या प्रदूषणाला जबाबदार आस्थापनांवर कारवाई व्हावी- आमदार व्हेंझी

मडगाव : कोलवा खाडीची पाहणी केली असता त्यात सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कारवाई करण्यात यावी. सांडपाणी नदीत, खाडीत सोडणार्‍या आस्थापनांवर कारवाई व्हावी. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी व्यक्त केले. खाडीनजीकचे स्वच्छतागृह बंद करून केवळ चेंजिंंग रुम ठेवण्याची पर्यटन खात्याकडे मागणी केली.

बाणावली आमदार व्हेंझी व्हिएगस, सरपंच सुझी फर्नांडिस व पंचायत मंडळ यांच्यासह गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी कोलवा खाडीच्या प्रदूषणाची पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. यावेळी आमदार व्हिएगस म्हणाले की, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोलवा खाडीतील पाहणीवेळी मानवी विष्ठेचे नमुने आढळून आलेले आहेत. 

कोलवा खाडी, वार्का खाडी व साळ नदीचा प्रश्न ज्यावेळी काढण्यात येतो त्यावेळी राज्य सरकारकडून कुणीही कारवाई करण्यास पुढे येत नाहीत. स्वच्छतागृह व चेंजिंग रुमची सुविधा पर्यटकांसाठी केलेली आहे. पण स्वच्छता गृहांचे सांडपाणी थेट खाडीत सोडण्यात येत असल्यास व त्याची काळजी घेण्यात येत नसल्यास ते बंद करण्यात यावे. 

सध्या नाताळ व नववर्षासाठी पर्यटक गोव्यात येत असतानाच कोलवा खाडी व किनारी भागात प्रदूषण आढळल्यास त्याचा परिणाम पर्यटनावर होणार असल्याचे व्हिएगस म्हणाले. 

सरपंच सुझी फर्नांडिस यांनी सांगितले की, कोलवा खाडीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पंचायतीला मिळालेली होती. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात सांडपाणी थेट खाडीत सोडण्याचा प्रकार घडला होता. त्याविरोधात पोलीस तक्रार केलेली होती. मात्र न्यायालयातून आदेश आणत हा प्रकार पुन्हा सुरू करण्यात आला होता. 

आता तपासणी दरम्यान सांडपाणी थेट खाडीत सोडण्याचा प्रकार होत असल्याचे पाहणीवेळी आढळून आले आहे. मात्र यावर आळा घालण्यासाठी पर्यटकांना चेंजिंग रूमची सोय असावी मात्र सांडपाणी खाडीत सोडल्यास त्यावर प्रदूषण खात्याने कारवाई करावी अशी मागणी सरपंच फर्नांडिस यांनी केली. 


साळ नदीतील प्रदूषणाबाबत कारवाई का नाही?
मडगाव व फातोर्डा येथून सांडपाणी थेट साळ नदीत सोडण्याचा प्रकार होत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस भूमिका घेत कारवाई करण्यात येत नाही. साळ नदीतून वाहून येणारी सर्व घाण कोलवा समुद्रात येत आहे. हे बंद होण्याची गरज असल्याचेही आमदार व्हिएगस म्हणाले.

हेही वाचा