खासगी जागेतील बांधकाम नियमनाचे अर्ज लवकरच निकाली

मंत्री आलेक्स सिक्वेरा : अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th December, 11:09 pm
खासगी जागेतील बांधकाम नियमनाचे अर्ज लवकरच निकाली

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकार्‍यांना खासगी जागेतील बांधकामांचे नियमन करण्याबाबत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत. खासगी जागेतील बांधकामे नियमित करण्यासाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात येतील. सार्वजनिक जागेतील बांधकामांचे नियमन केले जाणार नाही. अर्ज फेटाळण्यात यावा किंवा मंजूर करण्यात यावा. कोणतीही कार्यवाही केली तरीही ते अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर मंत्री सिक्वेरा म्हणाले की, जन्म प्रमाणपत्रांचे प्रश्न, सांडपाणी वाहिन्यांचे प्रश्न, सबरजिस्ट्रार कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांबाबत अनेक प्रश्न घेऊन नागरिक आले होते. शक्य असलेले प्रश्न तत्काळ सोडवण्यास सांगण्यात आले आहेत.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहांचा प्रश्न अनेक महिने प्रलंबित होता. ते काम आता ३१ डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. १ जानेवारीपासून सर्व स्वच्छतागृहे सुरू असतील. या कामांचा आढावा अधिकार्‍यांकडून घेण्यात आला आहे. चांगले प्रशासन आठवडा या उपक्रमांतर्गत दक्षिण गोव्यातील विविध उपजिल्हाधिकारी कार्यालयात शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याठिकाणी आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात येत आहेत. याशिवाय नुवे मतदारसंघातील पाण्याच्या समस्या आहेत. माजोर्डा, उत्तोर्डा परिसरात पाण्याच्या समस्या असल्याचे समजते. त्या अनुषंगाने पाण्याच्या समस्या कोणत्या भागात आहेत, याचा आढावा घेतलेला आहे, असेही मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

दोन दिवसांत सीमांकनाचे काम पूर्ण

वेळसाव येथील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या भू संपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी सीमांकन करण्यात येत आहे. त्याठिकाणी कोणत्याही अडथळ्याविना सीमांकनाचे काम केले जात आहे. दोन दिवसांत हे सीमांकनाचे काम पूर्ण होईल, असेही स्पष्ट केले. 

हेही वाचा