राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज शुक्रवारी तीन आमदारांसह अर्थसंकल्पपूर्व बैठकीसाठी राजस्थानला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री या तिन्ही आमदारांसह राजस्थानहून थेट दिल्लीत जाणार असल्याने राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांसमवेत मगोचे आमदार जीत आरोलकर, आमदार कृष्णा साळकर व आमदार प्रेमेंद शेट सुद्धा दिल्लीला जात असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जैसलमेर - राजस्थान येथे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी अर्थसंकल्पपूर्व बैठक होणार आहे. तसेच जीएसटी परिषदेचीही बैठक होणार आहे.
संसद अधिवेशनाचा समारोप आज होत आहे. संसद अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळात बदल होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एका मुलाखतीत मागेच स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह तीन आमदारांच्या दिल्ली भेटीबद्दल कमालीची उत्सुकुता निर्माण झाली आहे. सभापती रमेश तवडकर, आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह अन्य आमदारांनीही काही दिवसांपूर्वी दिल्ली वाऱ्या केल्या होत्या.