सासष्टी : बेकायदेशीररीत्या बीफ आणल्याच्या आरोप करत चौकशीसाठी गेलेल्या गोरक्षकांना मारहाण

गोरक्षकांनी तिघांना मारल्याचा एसजीपीडीएतील विक्रेत्यांचा केला दावा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
8 hours ago
सासष्टी : बेकायदेशीररीत्या बीफ आणल्याच्या आरोप करत चौकशीसाठी गेलेल्या गोरक्षकांना मारहाण

मडगाव : कर्नाटकमधून बेकायदेशीररीत्या बीफ आणल्याच्या संशयावरुन एसजीपीडीए मार्केटमध्ये गाडीची पाहणी व चौकशीसाठी गेलेल्या गोरक्षकांना मारहाण करण्यात आली. त्यांना सध्या इस्पितळात दाखल केलेले आहे. तर येथील विक्रेत्यांनीही गाडीच्या तपासणीसाठी आलेल्या गोरक्षकांनी तिघाजणांना मारहाण केल्याचा दावा केलेला आहे. 

 मडगाव एसजीपीडीएच्या चिकन मार्केटनजीक ही घटना घडली. कर्नाटकामधून बीफची आयात झाल्याची माहिती मिळाल्यावरुन काही गोरक्षक चौकशीसाठी मार्केटकडे आलेले होते. त्यांनी येथील लोकांना गाडी दाखवण्यास सांगितले आणि नंतर मारहाणीचा प्रकार घडला. एसजीपीडीएतील तीन बीफ विक्रेत्यांना बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा विक्रेत्यांनी केलेला आहे. 

 एसजीपीडीएतील दुकाने बंद करत विक्रेत्यांनी तक्रार करण्यासाठी फातोर्डा पोलिस ठाणे गाठले. विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता काहीजण आले व त्यांनी गाडी खुली करुन आत काय आहे ते दाखवण्यास सांगितले. त्यांना तुम्ही कोण अशी विचारणा करत विक्रेत्यांनी गाडी दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर वादावाद झाली व त्यांनी लोखंडी सळी काढत तिघांना मारहाण केलेली आहे. यात अफजल बेपारी, माजिद बेपारी, युनूस बेपारी हे तिघे जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे मांसाच्या मार्केटमध्ये येणार्‍या गाड्यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच मार्केटमध्येही पोलीस तैनात करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. मार्केटमध्ये आणण्यात आलेले ते गोवा मीट  कॉम्प्लेक्समधून आणण्यात आलेले मांस आहे. हे बीफ असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. कुणाला याबाबत शंका असल्यास त्यांनी गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये जात चौकशी करावी, असेही सांगितले.

भगवान रेडकर यांनी सांगितले की, एसजीपीडीएच्या मार्केटमध्ये कर्नाटकातून बीफ घेऊन गाडी आणल्याची माहिती मिळाल्याने याची पाहणी करण्यासाठी गोरक्षक म्हणून काहीजण तिथे गेले होते. त्याठिकाणी एक गाडी रिकामी झालेली होती व दोन बंद गाड्या लपवून ठेवल्या होत्या. त्यांनी गाडीलाही हात लावला नाही पण ते मारण्यास येत असल्याचे पाहून ते रस्त्यावर येत उभे राहिले व पोलिसांना फोन केला. त्याठिकाणी येत काहीजणांनी गोरक्षकांना मारहाण केली. यात किरण आचार्य व साई मालवणकर यांनी दुखापत झालेली आहे. त्यांना सध्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केलेले आहे. सध्या एसजीपीडीएतील मांस विक्रेत्यांकडूनही तिघांना मारहाण झाल्याची तक्रार फातोर्डा पोलिस स्थानकात देण्यात आलेली आहे. गोरक्षकांकडूनही मारहाणीची तक्रार देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा