कझान विमानतळावरील सर्व उड्डाणे स्थगित. रशियन तपास यंत्रणा अलर्टमोडवर
कझान : रशियातील कझान शहरात शनिवारी सकाळी यूक्रेनद्वारे मानवरहित ड्रोनच्या माध्यमातून भीषण हल्ला करण्यात. समोर आलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कझानवर तब्बल ८ ड्रोन हल्ले केले. त्यापैकी ६ हल्ले निवासी इमारतींवर झाले. कझान शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून ७२० किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत या हल्ल्यात कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, यामध्ये अनेक ड्रोन इमारतींना आदळताना दिसत आहेत. या हल्ल्यांनंतर कझानसह रशियाचे दोन विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
चार महिन्यांपूर्वी, रशियावर असाच हल्ला झाला होता. रशियातील साराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या ३८ मजली निवासी इमारतीला युक्रेनने त्यावेळी लक्ष्य केले. या शहरात रशियाचा स्ट्रॅटेजिक बॉम्बर मिलिटरी बेसही आहे. या हल्ल्यात ४ जण जखमी झाले. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर १०० मिसाईल्स आणि १०० ड्रोन डागले. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर दीडशेहून अधिक जण जखमी झाले
याआधी शुक्रवारी युक्रेनने रशियाच्या कुर्स्क सीमेवर अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी रशियाचे अण्वस्त्र प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला होता. हल्ल्याच्या वेळी, किरिलोव्ह अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. यामध्ये किरिलोव्हसोबत त्याचा सहाय्यकही मारला गेला. दरम्यान किरिलोव्हची हत्या युक्रेननेच केली असे रशियाचे म्हणणे होते. नंतर युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सी (एसबीयू) शी संबंधित एका हँडलरने याची जबाबदारी घेतली होती. युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिसेस (एसबीयू) ने आरोप केला आहे की किरिलोव्हच्या नेतृत्वाखाली रशियाने युक्रेन विरोधातील युद्धात सुमारे ५००० वेळा रासायनिक शस्त्रे वापरली आहेत.
२००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने ४ विमानांचे अपहरण केले होते. यापैकी ३ विमाने अमेरिकेतील ३ महत्त्वाच्या इमारतींवर एकामागून एक आदळली. पहिले विमान सकाळी ८.४५ वाजता इमारतीवर आढळले. बोईंग ७६७ हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर वेगाने आदळले. १८ मिनिटांनंतर, दुसरे बोईंग ७६७ इमारतीच्या दक्षिण टॉवरवर आदळले. या हल्ल्यांमध्ये सुमारे ३००० लोक मारले गेले.