२०२३ साली पहिल्यांदाच युगांडामध्ये डिंगा डिंगा विषाणूची नोंद झाली. या विषाणूमुळे उद्भवलेल्या रोगाने प्रभावित रुग्ण चक्क नाचू लागतो. महिला आणि मुली या आजाराने सर्वाधिक प्रभावित.
बुंदीबाग्यो : भारतापासून साडेपाच हजार किलोमीटर अंतरावर आफ्रिका खंडात एक देश आहे - युगांडा. युगांडामध्ये सध्या एक 'गूढ' आजार पसरत आहे. 'डिंगा डिंगा' असे या आजाराचे नाव आहे. स्थानिक लोकांनी हे नाव दिले आहे. डिंगा डिंगा म्हणजे नाचणे- थरथरणे. या आजारामुळे ग्रसीत व्यक्तीच्या अंगाचा थरकाप होतो आणि हे बघणाऱ्याला असे वाटते की ती व्यक्ती नाचत आहे.
प्राप्त माहितीनुसार युगांडामध्ये ३०० हून अधिक लोकांना डिंगा डिंगा विषाणूची लागण झाली आहे. त्यात बहुतांश महिला आणि मुली आहेत. युगांडातील बुंदीबाग्यो जिल्ह्यात या गूढ आजाराचा सर्वात मोठा परिणाम दिसून आला आहे. आतापर्यंत याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार जेव्हा रुग्णाला या विषाणूची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात तीव्र थरकाप सुरू होतो. हा हादरा इतका तीव्र आहे की रुग्ण नाचत असल्यासारखे दिसते. संसर्ग गंभीर असल्यास, रुग्णाला अर्धांगवायू देखील होऊ शकतो. बुंदीबाग्यो जिल्हा आरोग्य अधिकारी कियिता क्रिस्टोफर यांच्या मते, हा विषाणू २०२३ मध्ये पहिल्यांदा आढळला होता. तेव्हापासून युगांडा सरकार आणि येथील शास्त्रज्ञ यावर संशोधन करत आहेत. अद्यापही यावर तोडगा सापडलेला नाही.
युगांडाच्या आरोग्य विभागाने अद्याप डिंगा डिंगा विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विभागाने लोकांना वेळेवर औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांना बुंदीबाग्यो येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवालानुसार, या आजारापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही. आरोग्य अधिकारी कियाता यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित लोकांवर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जात आहेत. यातून सावरण्यासाठी सुमारे एक आठवडा लागणार आहे. बुंदीबाग्यो व्यतिरिक्त इतर कोणत्याही जिल्ह्यात विषाणूची प्रकरणे आढळून आलेली नाहीत.
दरम्यान अनेक लोक डिंगा डिंगा ची तुलना 'डान्सिंग प्लेग'शी करत आहेत. १५१८ साली फ्रान्समध्ये डान्सिंग प्लेग पसरला. या आजाराने ग्रस्त लोक सतत नाचताना दिसले. आणि ते अनेक तास, अगदी दिवस नाचत राहिले. असे केल्याने ते थकले व मृत्यू पावले. मात्र, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार डिंगा डिंगा तितकासा गंभीर नाही. परंतु रोग कोणताही असो, प्रतिबंध आणि उपचार दोन्ही आवश्यक आहेत. युगांडाचे आरोग्य अधिकारी हा रोग टाळण्यासाठी स्वच्छता राखण्याची शिफारस करत आहेत.
दुसरीकडे, काँगोमध्ये (डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो) आणखी एक गूढ रोग वेगाने पसरत आहे. यामुळे काँगोमध्ये आतापर्यंत १४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. कांगोच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या विषाणूच्या रूग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, खोकला आणि मलेरियासारखी गंभीर फ्लूसारखी लक्षणे दिसतात.
जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला 'डिसीज एक्स' असे नाव दिले आहे. कारण त्याचा पूर्ण तपास झालेला नाही. या विषाणूमुळे अनेकांनाआपला जीव गमवावा लागला आहे, त्यापैकी बहुतेक मुलांचे वय सुमारे ५ वर्षे आहे. जागतिक आरोग्य संघटना या आजाराबद्दल अधिक माहिती गोळा करत आहे.