सौदीच्या डॉक्टरला अटक, घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू
म्युनिच : जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये वर्दळीच्या ठिकाणी घुसलेल्या एका वेगवान कारने लोकांना चिरडले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाले. पोलिसांनी सौदीतील एका ५० वर्षीय डॉक्टरला अटक केली आहे. हा डॉक्टर २००६ पासून जर्मनीत राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कार तब्बल ४०० मित्र अंतरापर्यंत अनेक लोकांना चिरडून मार्केटमध्ये घुसली. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. मॅग्डेबर्गच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ३७ जण गंभीर जखमी झाले असून यातील १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
२०१६ मध्येदेखील बर्लिनच्या ख्रिसमस मार्केटमध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी ट्युनिशियाच्या एका नागरिकाने ट्रकने १२ जणांना चिरडून ठार केले होते. त्यावेळी आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. अधिकाऱ्यांनी ख्रिसमस मार्केटला संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे सांगितले होते. सद्यघडीस स्थानिक मंत्री हसलोफ यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
जखमींना मदत करण्यासाठी प्रशासन सक्रिय असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेमुळे ख्रिसमसच्या शांततापूर्ण वातावरणाला तडा गेला आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात समोर आलेल्या महितीनुसार, आरोपीने म्युनिच राज्याची नंबर प्लेट असलेल्या भाड्याच्या कारमध्ये ही घटना घडवली. कारच्या आत एक बॅग सापडली असून त्यात स्फोटके असण्याची शक्यता तपासली जात आहे.
तथापि, अधिकाऱ्यांनी सध्या हे एकाच हल्लेखोराचे कृत्य असल्याचे सांगितले. दरम्यान जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या घटनेबद्दल तीव्र दु: ख व्यक्त केले आहे . फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियानेही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.