नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या कथित विधानाविरोधात आज विरोधक पुन्हा संसदेबाहेर निदर्शने करत आहेत. सद्यघडीस विरोधी पक्षाचे खासदार विजय चौक ते संसद भवनापर्यंत मोर्चा काढत आहेत. त्यात प्रियंका गांधीही सहभागी झाल्या होत्या. मात्र, आज राहुल गांधी दिसले नाही.
काल १९ डिसेंबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या खासदारांकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता. दुपारी १२च्या सुमारास मकरद्वारावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली. ओडिशाचे बालासोरचे खासदार प्रताप सारंगी आणि फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यात जखमी झाले. दोन्ही नेत्यांच्या डोक्याला दुखापत झाली, त्यानंतर त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन्ही खासदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बांसूरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, धमकावणे आणि धक्काबुक्की करण्याच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) वगळता फक्त ६ कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सदर घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार आहे. दरम्यान आरएमएल रुग्णालयांचे डॉक्टर अजय शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत यांची प्रकृती स्थिर आहे. दोघांचा रक्तदाब नियंत्रणात असून, मेडिकल टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. सिटी स्कॅन तसेच एमआरआय रिपोर्ट नॉर्मल आहेत.
बातमी अपडेट होत आहे.