ज्याच्या जीवावर आपण जगतो, अशा आपल्या गोधनाप्रती कृतज्ञ असलेली घरणीबाई आपल्या गोठ्यावर, गोठ्यातल्या गाईवर, बैलावर, वासरावर आपल्या पोटच्या पोरासारखे प्रेम करायची. गोठ्यातली गाय तर तिची सखीच असायची.
गोवा... भारतमातेच्या कुशीतले अगदी लहानगे बाळ. एका बाजूने सह्याद्रीच्या उंच उंच कडा, तर दुसऱ्या बाजूने खोल खोल समुद्र. याच्यामध्ये भगवान परशुरामाच्या कृपेने निर्माण झालेली ही पवित्र भूमी गोमंतभूमी. गोवा या नावाविषयी अनेक आख्यायिका आहेत. या आख्यायिकांवरूनच गोमंतक, गोवापुरी, गोमांचल अशी नावे गोव्याला लाभलेली आपल्याला दिसून येतात. पण या सर्व नावांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ‘गो’ हे अक्षर आणि हे अक्षर गोमाता या नावावरूनच घेतले असावे असेही काही इतिहास करायचे मत आहे. या बाबतीत मतमतांतरे असली तरीही एक गोष्ट मात्र आपण नजरेआड करू शकत नाही, ती म्हणजे गोवा प्रदेशातील प्रत्येक जनमानसात आढळून येणारी गोमातेवरची निस्सीम भक्ती.
आज काळ जरी बदलला असला. शेतीप्रधान गोवा आधुनिकतेकडे झुकत असला तरी अगदी दहा-पंधरा वर्षांमागे जरी आम्ही डोकावलो, तर आपल्या लक्षात येईल की एका गावात जेवढी घरे होती, तेवढेच गोठे होते. ज्या माणसाचे घर गाई गोधनाने भरलेले असायचे तोच माणूस तालेवार समजला जाई. काही इतिहासकारांचे असेही मत होते की, गोव्यामध्ये आढळून येणारी ‘श्वेत कपिला’ ही गाय म्हणजे कामधेनु, गाईचे वासरू. कपिला गाय या वंशावळीतून जन्मलेली आहे. गोव्यातील गोभक्त असेही मानतात की श्वेत कपिला गायीचे दूध उत्तम दर्जाचे आहे. या दुधामध्ये सोन्याचा अंश सापडतो. तिचे दूध लहान बाळापासून सर्वांसाठीच आरोग्यवर्धक आणि बुद्धीवर्धक आहे. अशी ही गोमातेच्या सभोवताल फिरणारी गोव्याची संस्कृती.
ही गोमाता म्हणजेच गाय ज्याप्रमाणे गोमंतकीय संस्कृतीत व्यापून राहिली आहे त्याचप्रमाणे ती घरणीबाईच्या जात्याच्या ओवीमध्ये सुद्धा व्यापून राहिली आहे. म्हणून आपले जाते मांडल्यावर घरणीबाई गाऊ लागते,
अशी चरती गाई म्हशी गे
चरती गाई म्हशी
गिरीजा ही गवळ्याची
हाती माळा ही पवळ्याची
शंभू देवाका वाहूक गेली
अशी मांडवाचे नी दारी
हिरव्या कुरणावर चरणाऱ्या गाई म्हशींपैकी गवळ्याची गिरीजा ही गाय हाती पवळ्यांची माळ घेऊन शंभू देवाला वाहण्यासाठी मांडवाचे दारी म्हणजेच देवळाच्या मंडपाच्या दारी उभी आहे अशी कल्पना घरणीबाई आपल्या ओव्यातून करते. गिरीजा गाय, पवळ्यांची माळ आणि शंभू देव ह्या तिघांचा संबंध गोव्याच्या संस्कृतीशी जोडलेला आहे. गाईला गिरीजा अशा नावाने ही गोव्यामध्ये संबोधले जाते. गोव्याचे आराध्य दैवत हे शंभू म्हणजेच महादेव आहे. म्हणूनच गोव्यामध्ये प्रत्येक गावात एक ना एक महादेवाचे मंदिर आढळून येते. सप्तकोटेश्वर, चंद्रनाथ, भूतनाथ, रवळनाथ
अशा अनेक नावाने श्री महादेव गोव्याच्या भूमीवर विराजमान आहे. गावागावातील कित्येक मंदिरे ही स्वयंभू आहेत.
या मंदिरातील महादेव लिंगाचा शोध कसा लागला? असा प्रश्न विचारला असता अनेक स्वयंभू मंदिरे असलेल्या गावातील लोक सांगतात की अमुक अमुक माणसाची एक गाय एका ठराविक ठिकाणी जायची. तिथे गेल्यावर तिला पान्हा फुटायचा आणि त्या ठराविक ठिकाणीच तिचे दूध उतू जायचे. यामागचे कारण जाणण्यासाठी तिच्या मालकाने तिथे खोदकाम केलेले असायचे. खोदकाम करता करता तिथे महादेवाचे लिंग सापडलेले असायचे. अनेक देवळांच्या मागे अशी आख्यायिका ऐकू येते. या आराध्य देवतेसाठी त्या गावची गिरीजा नवरत्नांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पवळ्याची माळ घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी उभी आहे अशी कल्पना करताना घरणीबाई कैलासनाथा चरणी लीन होताना आपल्याला दिसते.
गोवा पूर्वी कृषीप्रधान प्रदेश होता. इथे प्रत्येक गावागावात आपल्या पोटापुरता तांदूळ पिकवला जायचा. या तांदळालाच ‘साळी’ असेही म्हटले जाते. साळवली, साळ अशी गावे म्हणजे ह्या कृषी संस्कृतीचे पुरावे. तसेच नाचणी पिक गोव्याच्या डोंगरमाथ्यावर घेतले जाई. ही शेती करताना शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असायचा तो म्हणजे बैल आणि गायी. घरणीबाईला याची पूर्ण जाणीव असायची आणि म्हणून ती आपल्या ओव्यातून म्हणते,
सरला माजा दळाप
ह्या गे सरला म्हणू कशी
बंधूचे एकादशी
गहू भड्डीले
एकादशी सणाच्या निमित्ताने घरणीबाईने आपल्या भावाच्या घरी सोळा राशी गहू (यामध्ये भात किंवा नाचणी यांचाही सहभाग असू शकतो) भड्डिले म्हणजेच दळले. यातून पीठ आणि कोंडा बाजूला करताना कोंडा जळीमळी पसरतो. पण हा कोंडाच आहे त्यामुळे फेकून द्यायचा असा विचार घरणीबाईच्या मनात कधीच येत नाही. उलट अशा वेळी तिला आठवते गाय आणि तिचा लेक नंदीबैल. आणि ती गाऊ लागते,
नाचण्याचो घे कुणो
कोण उडोव नये सानी गोटा
गायतरीच्या गे पोटा
नंदीबैल तो जन्म घेता
नाचण्याचे पीठ केल्यानंतर विलग केलेला कोंडा ‘सानी गोटा’ फेकू नये. ‘सानी गोटा’ म्हणजे जमिनीचे कोपरे. हा कोंडा सानी गोटा फेकण्यापेक्षा तो आपल्या घराचे पोषण करणारी गाय आणि नंदीबैल यांच्यासमोर ठेवावा. हा कोंडा जरी असला, तरी ती दोघे याचे आनंदाने सेवन करतील. असा विचार करत घरणीबाई गाय आणि बैल यांचे आपल्या घरावर कसे उपकार आहेत हे सांगताना म्हणते,
एवढ्या कुटामाचो
ह्यो गे सांभाळ केलो कोणी
गाईच्या पाडकांनी गे
हे घे जूवाला खांद दिलो
दनपाराच्या गे पारा
ही घे गायतरी बांधली जोता
सोड सोड रे भगवंता
जशी गायतरी शरणा येता
आपल्या संपूर्ण कुटुंबाचा, ज्यामध्ये सासू-सासरे, दीर जाऊ, त्यांची मुले बाळे, आपला नवरा, आपली मुले बाळे, आपण या या सर्वांचा समावेश असतो. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळ जर कोणी केला असेल, तर तो आपल्या गोठ्यातल्या गाईने आणि तिच्या पालकांनी. कारण अगदी कोवळ्या वयातच ह्या गाईच्या पाडकांनी नांगराच्या जूवाला खांदा दिलेला असतो. भर दुपारी निष्पाप गाय सुद्धा शेत करताना आपण जोताला म्हणजेच नांगरणीला बांधलेली असते. हे मानेवरचे ओझे असह्य झाल्यामुळे कितीतरी वेळा ‘गायतरी’ने मनोमन देवाची प्रार्थना केली असेल की आपल्याला या त्रासातून सोडव. कितीदा तरी ही प्रार्थना घेऊन ती देवाला शरण गेली असेल. पण तरीसुद्धा ती आपल्या कर्तव्याशी कधी विन्मुख झाली नाही. घरणीबाई एक स्त्री आहे आणि म्हणून ती स्त्रीचे दु:ख जाणू शकते. आपल्या घरी आलेल्या धान्याचा कणकण म्हणजे गाय आणि बैल यांच्या घामाचे थेंब आहेत याची जाणीव घरणीबाईला असते. म्हणूनच ज्यांच्या जीवावर आपण ह्या धान्याच्या राशी उभ्या केल्या, त्या धान्यातून मिळणारा कोंडा तरी निदान त्यांच्या मुखात जाऊ दे अशी उदात्त शिकवण घरणीबाई फक्त देत नसायची; तर दर दिवशी न चुकता तो कोंडा तांदळाच्या पेजेसोबत गाई बैलांच्या पुढ्यात ठेवत असायची. अन्नाचा आदर आणि गाई-गोधनाविषयीचे प्रेम ह्या दोन्ही गोष्टी तिच्या एका क्रियेतून जाणवायच्या.
ज्याच्या जीवावर आपण जगतो, अशा आपल्या गोधनाप्रती कृतज्ञ असलेली घरणीबाई आपल्या गोठ्यावर, गोठ्यातल्या गाईवर, बैलावर, वासरावर आपल्या पोटच्या पोरासारखे प्रेम करायची. गोठ्यातली गाय तर तिची सखीच असायची. आपल्या घरातील कौटुंबिक कष्टांपेक्षा गाईच्या अंगावरच्या एखाद्या छोट्याशा फोडाने ती विचलित व्हायची. भूतदया हा विषय तर तिच्या ऐकिवातही नव्हता पण घरणीबाई आपल्या ह्या गाई गोधनावर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्सीम प्रेम करायची, हे मात्र नक्की.
गौतमी चोर्लेकर गावस