सात आमदारांनी केलेल्या आरोपांचा भाऊसाहेबांनी नेमलेल्या नव्या कार्यकारिणीने तीव्र शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्री भाऊसाहेब राजीनामा देणार अशी घोषणा आमदार शशिकला काकोडकर यांनी केली.
मडगावचे एम.एस.प्रभू हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. एल.आय.सी.चे ते सर्वात मोठे एजंट होते. राजकारणात ते किंग मेकर होते. मोठे दानशूर होते. १९८० मध्ये पेडणे येथे आठवी राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आयोजन समितीचा मी अध्यक्ष होतो. निधी गोळा करण्यासाठी मडगावला गेलो असता रात्री उशिरा त्यांचे घर गाठले. स्वागत चहापान झाल्यावर कबड्डी स्पर्धेचा विषय काढला तेव्हा लगेच ५ हजारांचा चेक काढून हातात दिला. पैसे थोडे कमी पडतात असे म्हणताच उद्या सकाळी ११:४५ वाजता पणजीतील एका बड्या उद्योगपतीच्या कार्यालयाबाहेर मला भेट असे सांगितले. दुसऱ्या दिवशी मी गेलो तर सांगितल्याप्रमाणे ते आले. आणि चेक माझ्या हातात दिला. अडल्याला हात देणारे प्रभू मगो पक्षाचे आधारस्तंभ होते.
असे हे दानशूर प्रभू मगो पक्षाचे सरचिटणीस होते. भाऊसाहेब बांदोडकर विदेश दौऱ्यावर असताना एम. एस. प्रभू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय युवक संघटनेने गोव्यात शिवजयंती समारोह आयोजित करून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. बाळासाहेब ठाकरे यांना निमंत्रण म्हणजे आपल्या नेतृत्वाला आव्हान असं भाऊसाहेबांना वाटले आणि त्यांनी एम.एस.प्रभूंना बडतर्फ केले. या बडतर्फीला प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला. पक्षाच्या सर्वसाधारण सभेने आपल्याला निवडलेला असल्याने आपल्याला पक्षाचे अध्यक्ष बडतर्फ करु शकत नाहीत असा दावा करत प्रभू यांनी भाऊसाहेबांना आव्हान दिले. या ठिणगीने मगो पक्षातील मतभेदांना वाचा फुटली.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ जून १९७० रोजी पक्षाचे उपाध्यक्ष के.बी.नाईक यांच्यासह अकरा प्रमुख नेत्यांच्या सह्यानिशी भाऊसाहेबांविरुद्ध एक पत्रक काढले. बडतर्फी करणे तसेच कार्यकारिणीवर १० अतिरिक्त सदस्य नेमणे बेकायदा असल्याचा दावा या पत्रकात केला होता. या पत्रकावर मंत्री अँथनी डिसोझा, के.बी.नाईक, मंत्री गोपाळ मयेकर, मंजू गांवकर, गजानन पाटील, वामन राधाकृष्ण, दत्ताराम चोपडेकर, जिवा गांवकर, शांताराम कांबळी, मोतीलाल बांदेकर व एम.एस.प्रभू यांच्या सह्या होत्या. आपली सही जबरदस्तीने घेण्यात आल्याचा दावा नियुक्त आमदार शांताराम कांबळी यांनी केला होता. या वादावर चर्चा करण्यासाठी मगो कार्यकारिणीची विशेष बैठक पणजीतील टुरिस्ट हॉस्टेलमध्ये बोलाविण्यात आली होती. पण राजकीय दबावामुळे ऐनवेळी सभागृह नाकारण्यात आले. त्यामुळे मंत्री अँथनी डिसोझा यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
या बैठकीला कार्यकारिणीच्या १८ सदस्यांपैकी १५ सदस्य उपस्थित होते. स्वत: भाऊसाहेब बांदोडकर, काशिनाथ महाले व त्रि.ज.देसाई हे तिघेजण गैरहजर होते. यावरून जवळजवळ संपूर्ण कार्यकारिणीच भाऊसाहेबांच्या विरोधात होती हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे १० जून रोजी मगोच्या सात आमदारांनी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विरोधात १२ कलमी आरोपपत्र सादर केले. मुख्यमंत्री म्हणून मिळालेल्या अधिकाराचा वापर स्वत:चा व्यापार धंदा व वैयक्तिक लाभासाठी केला असा गंभीर आरोप केला होता. आपल्या विरोधकांवर सूड घेण्यासाठी सत्तेचा सूडबुद्धीने गैरवापर केला असा दुसरा आरोप होता. पक्षाच्या बैठकीत चर्चा न करता सरकारी धोरणविषयक अवास्तव घोषणा केल्या, सत्ता आपल्याच हाती केंद्रित राहावी म्हणून पक्षाची लोकशाही पद्धतीने उभारणी करणे जाणीवपूर्वक टाळणे असे एकूण बारा आरोप केले होते.
या आरोपांची नि:पक्षपाती चौकशी व्हावी म्हणून आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा नाईलाजाने पाठिंबा काढून घ्यावा लागेल असा इशारा दिला होता. सात आमदारांनी केलेल्या या आरोपांचा भाऊसाहेबांनी नेमलेल्या नव्या कार्यकारिणीने तीव्र शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्री भाऊसाहेब राजीनामा देणार अशी घोषणा आमदार शशिकला काकोडकर यांनी केली. नवा नेता निवडण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली. बंडखोर आमदार खूश झाले. नवा नेता निवडण्यासाठी ब़ोलावण्यात आलेल्या बैठकीत शशिकला काकोडकर यांचे नाव सुचविण्यात आले. नवे मंत्री कोण असावेत हे सौ.काकोडकर ठरवतील अशी अट घालण्यात आली. या वादातून अखेर मूळ प्रश्न बाजूला पडला आणि बंडखोर व बांदोडकर समर्थक यांच्यामधील वाद विकोपाला गेला.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)