गोव्यातील मंदिरांशी संबंधित वाद सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. देवस्थानांच्या निर्णयांमुळे सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण होत असून, त्यातून धर्म आणि समाज यांच्यातील भेदभाव अधिक ठळकपणे समोर येत आहे.
गोव्यातील मंदिरांशी संबंधित वाद सध्या चिंतेचा विषय बनले आहेत. देवस्थानांच्या निर्णयांमुळे सामाजिक आणि धार्मिक तणाव निर्माण होत असून, त्यातून धर्म आणि समाज यांच्यातील भेदभाव अधिक ठळकपणे समोर येत आहे. देवस्थानांच्या वादांतून हिंदू धर्मियांतच फूट पडत असताना एकोपा निर्माण करण्याचे कुठलेच प्रयत्न होत नाहीत. त्यातच दुसऱ्या धर्मियांना आपल्या जत्रा, उत्सवांमध्ये येऊ द्यायचे नाही असा भलताच सूर एका देवस्थानाने आळवला आहे. गोव्यातील हे धार्मिक वाद कुठल्या कुठे चालले आहेत. कुठे महाजन आणि ग्रामस्थांमध्ये तणाव आहे तर कुठे महाजनांमध्येच टोकाचे मतभेद होऊन मंदिर बंद करण्याची वेळ येते. सगळे विचित्र चित्र गोव्यात सध्या निर्माण झाले आहे.
कुंकळीच्या फातर्पेकरीण देवस्थानातील महाजनांनी आपल्या पाच दिवस चालणाऱ्या जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना दुकान लावण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने टीका होत आहे आणि आश्चर्यही व्यक्त होत आहे. काही कट्टर हिंदूंनी या निर्णयाचे समर्थन केले असले, तरी अशा निर्णयांनी समाजातील मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यताच अधिक आहे. जत्रा, उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम हे सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणणारे ठरायला हवेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बंदीमुळे धार्मिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त आहे. जर दुसऱ्या धर्मीयांनीही हिंदूंना अशीच बंदी घातली तर समाजातील शांतता टिकून राहणार नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सर्वधर्मीय विक्रेते अनेक जत्रांमध्ये आपले छोटे व्यवसाय करून उपजीविका चालवत असतात. अशा विक्रेत्यांच्या धर्मावरून भेदभाव करणे म्हणजे त्यांच्या उपजीविकेचा मार्ग बंद करणे होय. ज्यांचा व्यापार वर्षानुवर्षे धार्मिक उत्सवांवर अवलंबून आहे, अशा विक्रेत्यांना त्यांच्या धर्माच्या आधारावर जत्रेत प्रवेश नाकारणे हे माणुसकीला शोभणारे नाही.
जुने गोव्यात सुरू असलेल्या सेंट झेवियर अवशेष दर्शनात असलेली दुकाने कुठल्या धर्मियांची आहेत हे कोणी तपासले आहे? काही लोकांनी देवस्थान समितींची डोकी भडकवून अशा प्रकारचा धार्मिक दुरावा निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. देवस्थान समित्यांना हे प्रयत्न हाणून पाडायला हवेत. अशा लोकांच्या घरातही मुस्लिमांच्या दुकानातून दिवसाला एक तरी जिन्नस जात असेल हे लक्षात ठेवावे. जो माणूस जत्रेतून खेळण्यांची दुकाने घेऊन फिरत असतो त्याचा पोटापाण्याचा तोच व्यवसाय असतो. त्याच्या जगण्याचा हक्क हिरावून घेण्यात कुठला आनंद ह्या लोकांना वाटतो ते कळत नाही. हिंदूच्या जत्रेत हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम असे सगळेच दुकाने घालत असतात. कोणी फुले विकतो, कोणी खाजे, कोणी खेळणी, कोणी कपडे तर कोणी फर्नीचर, भांडी विकत असतो. हे अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला नव्हेत. हे तेच लोक आहेत जे वर्षानुवर्षे जत्रेतल्या फेरीमध्ये आपल्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत फिरत असतात. एका अर्थाने आपण त्यांना फेरीवाले म्हणू शकतो. फिरते विक्रेतेही म्हणू शकतो. या विक्रेत्यांमध्ये जात, धर्म शोधण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. आज धर्म शोधत आहात, पुढे कधीतरी जाती शोधून लोकांना अस्पृश्य ठरवणार नाहीत याची हमी कोण देतो? इथे आडनाव ऐकूणच नाक मुरडणारे ‘पायलेक पाचशे’ भेटतात. देवाच्या सावलीखाली सर्वांनी सुखाने नांदावे असा संदेश जायला हवा. तिथे अमुक धर्माच्याने येऊ नये असा फतवा काढणे हे निश्चितच शोभनीय नाही.
मडकई मंदिरातील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. महाजन आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये देवस्थानाच्या अधिकारांवरून वाद निर्माण झाले आहेत. मूर्ती बदलण्याचा प्रस्ताव, पूजा पद्धती, आणि अधिकारांवरून मतभेदांनी तणाव वाढला आहे. अशा वादांमध्ये दोन्ही गटांनी सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे आहे. नवदुर्गा मंदिराचा वाद सोडवण्यासाठी त्रयस्थ मध्यस्थीची गरज आहे. देवीच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. कदाचित या दोन घटकांना फूस लावणारा किंवा या दोघांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी तिसरा घटकही जबाबदार असू शकतो. देवी नवदुर्गेची अखंडित सेवा व्हावी, तिच्या सेवेत बाधा येऊ नये म्हणून सर्वांनीच विचार करून समेट घडविण्याची गरज आहे.
पर्येतील साखळेश्वर देवस्थानाच्या वर्धापनदिनी महाजनांमध्ये झालेला वादही याच मालिकेतील आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व महाजनांनी वर्धापनदिन साजरा करायचा असताना काही महाजनांनी पहाटेच पूजा आटोपल्यामुळे वाद वाढला. प्रशासनाने हस्तक्षेप करून आधी मंदिर बंद केले. तिथे जमावबंदी लागू केली नंतर शांततेसाठी मंदिर खुले केले. सत्तरीतील मंदिर वाद ही नवीन गोष्ट नाही. महाजनांमधील ‘मोठे’पणाच्या वादांमुळे अनेक मंदिरांचे उत्सव बंद झाले आहेत. देवळांना टाळे आहे. महाजनांच्या अहंकारामुळे आज गोव्यात अनेक देव बंद खोलीत आहेत.
गोव्यातील देवस्थान वादांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी देवस्थान कायद्यात दुरुस्तीची गरज आहे. सरकारने देवस्थानांमध्ये आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रस्ताव मांडला होता, मात्र वादग्रस्त परिस्थितीमुळे तो प्रस्ताव गुंडाळण्यात आला. राजकारण्यांचे या वादांतील हस्तक्षेपही समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. गोव्यातील मंदिरे ही केवळ धार्मिक स्थळे नसून ती सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेची प्रतीके आहेत. परंतु महाजन, ग्रामस्थ आणि समाजातील विविध घटकांनी निर्माण केलेल्या वादांमुळे ही एकता दुर्बळ होत आहे. धर्म, जात आणि समाज या आधारांवर मंदिरांमधील व्यवस्थापनावर वाद घालण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन देवाच्या सेवेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
“देवा, तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो” या बालकवितेतील भावना प्रत्यक्षात उतरवायची वेळ आली आहे. मंदिर हे मानवतेचे आणि शांततेचे प्रतीक असायला हवे. देवाच्या सावलीखाली सर्व धर्म, जात आणि समाजाने एकत्र येऊन आनंदाने नांदावे, हीच अपेक्षा आहे. गोव्यातील देवस्थानांमध्ये वर्षानूवर्षे सुरू असलेले वाद पाहून या महाजनांना देवाच्या सुंदर आकाशाची आणि सुंदर प्रकाशाची प्रचिती लवकर येवो ही प्रार्थना.
पांडुरंग गांवकर
९७६३१०६३००
(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)