कहाणी अधुऱ्या स्वप्नांची

पाऊस आणि तिचं नातं मंदारला माहीत होतं. जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा ती अशीच खिडकीतून बाहेर एकटक पाहत राहायची‌‌. तिला पावसात भिजायला खूप आवडायचं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ती स्वतःला विसरून गेली होती.

Story: कथा |
15th December, 03:56 am
कहाणी  अधुऱ्या स्वप्नांची

त्या रात्री मंद पाऊस पडत होता. मंजिरी पावसाकडे खिडकीतून एकटक पाहत उभी होती. एवढ्यात मंदार आतून बाहेर आला व मंजिरीला एवढ्या तंद्रीत पाहून तसाच राहिला. पाऊस आता ओसरला होता पण मंजिरी भानावर काही आली नाही. त्यामुळे मंदार हळूच तिच्या मागे जाऊन खांद्यावर हात ठेवत ‘काय राणी सरकार कुठं हरवलात’ असं म्हणत तिला तंद्रीतून जागं केलं. मंदारला पाहून ती स्वत:ला सावरत विषय बदलत तिथून निघून गेली. 

पाऊस आणि तिचं नातं मंदारला माहीत होतं. जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा ती अशीच खिडकीतून बाहेर एकटक पाहत राहायची‌‌. तिला पावसात भिजायला खूप आवडायचं पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ती स्वतःला विसरून गेली होती. ती जर आजारी पडली तर घरातलं काम कोण करणार यासाठी ती स्वतःला कामामध्ये झोकून देई. 

एके दिवशी घरात ती एकटीच होती. तिच्या पुढून आपला गतकाळ ओघळू लागला. कॉलेजमध्ये असताना ती कॉलेज क्वीन होती, दिसायलाही ती सुंदर अगदी नावाप्रमाणे होती‌. सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन क्रमांक पटकावणं हे ठरलेलेच त्यामुळे ती असली की कोणी त्या स्पर्धेत सहभागी होताना विचार करत. ट्रेकींगची तिला आवड होती. ती वेगवेगळ्या ठिकाणी जायची, कधी मित्र मैत्रिणींबरोबर तर कधी एकटीच. तिच्या या आवडीला सर्वजण म्हणायचे आता जातेस लग्नानंतर जायला मिळेल ना. ती या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपली आवड जपत असे‌. अशीच वर्षे गेली व कॉलेज संपलं व ती कामाला जावू लागली. कालांतराने घरातली मंडळी तिच्या मागे लग्नाची मागणी करू लागली‌. वयही झाले होते म्हणून ती तयार झाली. तसं तिच्या मनामध्ये कोणी नव्हतं. खूप मुले तिला मागणी घालत होती पण तिने दुर्लक्ष केले होते. 

मंदारला पाहताक्षणी ती आवडली व काही दिवसातच तिचं लग्न झालं ती आता नवीन घरात वावरु लागली. काम, घर या सगळ्यात तिला स्वतःला वेळच मिळत नसे. कधी कधी तिला वाटे आपण लग्न करून घाई तर केली नाही. आणि ती अशीच कितीतरी वेळ आपल्या तंद्रीत असे. 

एके दिवशी कामावरून घरी ती लवकरच आली‌. तिला पाहून मंदार थोडा चक्रावला कारण हा वेळ तिच्या कामावरचा आणि काल तिने सांगितलेलं की आज मिटिंगमध्ये असणार, फोन वगैरे करु नकोस काही असेल तर मेसेज कर आणि तिला घरात पाहून मंदार विचार करु लागला. ती घरात आली व मंदारला किचनमध्ये नेलं आणि चहा करत दोघे गप्पा करु लागले. मंदारने तिला लवकर का आलीस म्हणून विचारले तरी तिने त्याला उत्तर दिले नाही. 

हॉलमध्ये दोघे बसले आता मंजिरी त्याला सांगू लागली, 'मंदार आपण केवढा पुढचा विचार केलेला ना, पुढच्या वर्षी तुझी बदली होणार आणि त्यानंतर आम्ही बाळाचा विचार करणार होतो, आम्ही तुझ्या आई बाबांकडे कायमचं राहायला जाणार होतो. मंदार इथं कंटाळा आला होता रे मला, घरात कोणीही नाही, घरी कामावरून यायचं परत घरातली कामं सकाळी परत तेच' मंदार एकदम चक्रावलाच एकदम ही अशी काय बोलते या विचारांमध्ये तो म्हणू लागला 'आज काय असं अभद्र बोलतेस कामावर काही झालं का?, आणि बाळाचा विचार आम्ही दोघांनी मिळून घेतला होता, तुला कंटाळा येणं साहजिकच गं, आम्ही परवा फिरायला जाऊया खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलो नाही' मंजिरी पुढे बोलू लागली 'मी तुझ्याबरोबर सदैव असेन मला प्रत्येक वेळी समजून घेतल्यामुळे धन्यवाद' तिच्या अशा बोलण्याने मंदार एकदम भारावला त्याला काहीच सुचेना घडलं तरी काय 'अगं मी तुला काय सांगतो आणि तू मला काय सांगतेस, मी तुझाच तर आहे मला काय धन्यवाद म्हणतेस' आता मंजिरीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती मनामध्ये म्हणत होती 'मी तुला आता  शेवटची दिसते यापुढे तुला माझ्याशिवाय जगायचे' तिच्या भारावलेल्या डोळ्यांकडे पाहत मंदार तिच्याजवळ गेला तेवढ्यातच मंजिरी त्याला त्याच्या वस्तु कुठे कुठे ठेवल्यात ते सांगू लागली. 'तू असताना मी का या गोष्टी आठवणीत ठेवू राणी सरकार' असं म्हणत तिला मिठीत घ्यायला तो पुढे झाला आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजला, फोन तसाच कानाला लावून तो थंड झाला. एक क्षण सगळंच त्याच्याभोवती थांबलं. तो मागे उभी असलेल्या मंजिरीकडे वळला पण तिथं मंजिरी नव्हती. हॉलमध्ये दोन कप व असंख्य आठवणी गिरक्या घेत होत्या.


-इंदू लक्ष्मण परब ,
मेणकुरे