नववीच्या वर्षापासून यूपीएससीची तयारी करावी. दहावीनंतर आवडीची शाखा निवडावी. आवडीच्या विषयात पदवी मिळवावी व समांतर जोडीला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी म्हणजे पुढे निराशा येत नाही.
खूपदा प्रश्न विचारला जातो की स्पर्धा परीक्षेसाठी मी कोणती डिग्री घेऊ? बी.ए. केले तर चालेल का? या प्रश्नाला पण काहीतरी ‘लॉजिक’ आहे कारण सुरुवातीच्या काळात लोक किंवा जाणकार याचे उत्तर, “हो बी.ए.लाच प्रवेश घे म्हणजे तुला पुढे सोपे जाईल.” अशा प्रकारचे मार्गदर्शन करायचे. त्यामुळे खूपदा मुलांचा गोंधळ व्हायचा की बी.ए. डिग्री मधील विषयांवरच यू.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम अवलंबून आहे व त्यामुळे ते बी.ए. ला प्रवेश घ्यायचे. परंतु हे उत्तर चुकीचे होते किंवा चुकीच्या संदर्भावर अवलंबून होते. “बी.ए. कर” या विकल्पाला खरे तर कारण असे होते की बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्याला इतर शाखांपेक्षा अभ्यासक्रमात मोकळा वेळ जास्त मिळतो व त्यावेळेचा सदुपयोग तो स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी करू शकतो. म्हणून फक्त या कारणासाठी लोक असा सल्ला द्यायचे. इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय नक्कीच बी.ए.चे आहेत व हे विषय यूपीएससीचे देखील आहेत. परंतु दोघांचा अभ्यासक्रम खूप वेगवेगळा आहे हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.
गेल्या अनेक वर्षात सनदी अधिकारी म्हणून बी.ई., एम.बी.बी.एस., बी.टेक. असे शिक्षण घेतलेले अनेक अधिकारी तयार झाले. त्यामुळे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी नुसत्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर सनदी अधिकारी होऊ शकतो. काही असेही विद्यार्थी बघितले की रस नसला तरी यू.पी.एस.सी.साठी म्हणून बी.ए. घेतले. चार ते पाच अटेंप्ट करून यू.पी.एस.सी.मध्ये अपयश आले त्यामुळे नावडत्या शाखेत शिक्षण व यू.पी.एस.सी.तील अपयश यामुळे पुढे नैराश्याच्या गर्तेतून त्यांनी आत्महत्या केली. येथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की शिक्षण हे नेहमी आपल्या आवडीचे व झेपणारे घ्यावे. मग ते काहीही असो कारण उद्या ते शिक्षण ‘प्लॅन बी’ बनून आपल्या रोजी-रोटीसाठी उपयोगी पडू शकते.
नववीच्या वर्षापासून यूपीएससीची तयारी करावी. दहावीनंतर आवडीची शाखा निवडावी. आवडीच्या विषयात पदवी मिळवावी व समांतर जोडीला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी म्हणजे पुढे निराशा येत नाही.
यूपीएससी व अविनाश धर्माधिकारी
ज्या विद्यार्थ्यांना यू.पी.एस.सी./जी.पी.एस.सी.मधून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कारकिर्द करायची आहे, त्यांनी youtube वर जाऊन अविनाश धर्माधिकारी यांची आय.ए.एस. विषयावरील भाषणे नक्की पहावीत. पुण्यामध्ये ‘चाणक्य मंडळ’ नावाची ही संस्था भावी आय.ए.एस., आय.पी.एस. घडवण्याचे काम अविरतपणे करत आहे. स्वत: अविनाश धर्माधिकारी हे आय.ए.एस. असून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त देखील होते. त्यांच्या गाठीशी अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय अनुभव आहेत.
Youtube वर जाऊन अविनाश धर्माधिकारी या नावाने सर्च करावे व सरांचे आय.ए.एस. विषयावरील भाषणे ऐकावीत. अत्यंत छान आणि सोप्या भाषेत त्यांनी आय.ए.एस.ची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन केलेले आहे. प्रशासकीय प्रक्रियेमध्ये नेमकं काम कसे असते? कसे चालते? प्रत्येकाचा रोल कसा असतो? आय.ए.एस. चे ध्येय ठरवताना नेमके पुढे काय वाढून ठेवलेले आहे? व त्याचे विचार मंथन त्यांच्या व्याख्यानातून ऐकायला मिळते.
आजपासून पुढील २५ वर्षात कसे काम करायचे याचे उत्तम मार्गदर्शन इथे मिळते. ‘लोकसेवा’ म्हणजेच लोकांची सेवा. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. लोकांची सेवा करायला जमली पाहिजे. उगाचच रुबाब करण्यासाठी या पोस्टच्या वाटेला जाऊ नये. धर्माधिकारी सरांचे अनेक छोटे मोठे व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहेत. ‘चाणक्य मंडळ’ या youtube चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले तर त्यांचे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील व विशेषत: गोमंतकीय विद्यार्थ्यांना याचा फार फायदा होईल.
-अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)