ही व्यक्ती एक कुशल सायकलपटू, उपक्रमशील शिक्षक, संवेदनशील पर्यावरण प्रेमी आणि मुख्य म्हणजे आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करणारा एक उभरता साहित्यिक होणार असे जर कोणी भविष्य काढले असते तर ऐकणाऱ्यांना थोडा विचार करावा लागला असता.
त्याचे बालपण आणि शालेय जीवन गेले ते शापोरा नदीच्या काठावर, पेडणे तालुक्यातील वझरी गावात... आजी सीता शेट्ये हिच्याबरोबर वयाची पहिली पंधरा वर्षे त्याने घालविली. मित्र पिपी–कुलदीप कामत याच्या सायकलवरून भ्रमंती केली. भरपूर खेळणे, दंगामस्ती करणे, मनसोक्त फिरणे हे तर त्याचे आवडते छंदच होते. रग्गड अभ्यास करायचा, परीक्षेत भरपूर गुण घ्यायचे, वर्गात अव्वल येऊन दाखवायचे ही सारी स्वप्ने त्याच्यापासून कोसो मैल दूरच होती. त्याला फक्त फिरायचे होते. नदीकाठी, गावात... त्याचे हेच छंद सर्वांना रिकामटेकडे वाटायचे. त्याचे फिरणे, गावभर हुंदडणे, त्याचे प्रश्न हे उद्धटपणाचे वाटायचे. त्याचे नाव घेतले की तो मस्तीखोर असेच नामकरण झाले होते.
अशी ही व्यक्ती एक कुशल सायकलपटू, उपक्रमशील शिक्षक, संवेदनशील पर्यावरण प्रेमी आणि मुख्य म्हणजे आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करणारा एक उभरता साहित्यिक होणार असे जर कोणी भविष्य काढले असते, तर ऐकणाऱ्यांना थोडा विचार करावा लागला असता. संकेत सुरेश नाईक या युवा साहित्यिकाच्या बाबतीत हे असेच घडले. एक उनाड मुलगा ते संवेदनशील, परिवर्तनशील शिक्षक... प्रवासवर्णन लिहिणारा अनुभवसमृद्ध लेखक हा त्यांचा असा प्रवास थक्क करणारा आहे. संकेत नाईक स्वत:च सांगतात, ‘अभ्यासात तेवढा मी हुशार नव्हतो. तेव्हा मग आईबाबांनी मला केरी साखळी येथे माझ्या मावशीकडे पौर्णिमा केरकरकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. तिथे मला माझे गुरू राजेंद्र केरकर भेटले. केरकर दांपत्याच्या सहवास मी अकरावी-बारावीत असताना ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयात मिळाला, तसा तो नंतर त्यांच्या घरी राहूनही मिळाला. आपल्याला लिहायचे आहे. संघर्ष आणि समस्यांचे अनुभव लिखाणातून व्यक्त करायचे आहेत याची पुसटशीही जाणीव मला नव्हती. माझी बारावी झाली, पुढे पदवी घेतली. डी. एड. केले. बाह्य पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.’
संकेत प्राथमिक शाळा शिक्षक म्हणून डिचोलीतील आंबेशी गावात रुजू झाला. ही शाळा रवींद्र कांबळी या गुरुजींच्या कामामुळे आधीच नावारूपास आलेली होती. संकेतने तिला अधिक झळाळी दिली. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा समन्वय साधत पर्यावरण, संस्कृती, सामाजिक वारसा याच्याशी निगडित उपक्रम राबविले. अजूनही राबवित आहे.
२००० साली संकेतची ओळख पर्यावरण जागृती फौजेच्या कार्यकर्त्यांशी झाली. पर्यावरणाशी निगडित विविध उपक्रमात त्याने गती निर्माण केली. विविध शाळा, महाविद्यालयात पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम राबवित असतानाच त्याला त्यातील बारकाव्याची सखोल जाणीव झाली. पुढे त्याच्यातील शिक्षकाने जागल्याची भूमिका घेत आपल्या छोट्या मुलांमध्ये पर्यावरण ओळख, त्याच्याप्रतिची संवेदनशील भावना निर्माण करण्याचा जणू काही विडा उचलून कार्यक्रमाची आखणी करायला सुरुवात केली. अध्यापनाला कृतीशीलतेची जोड देऊन मुलांना हसत खेळत शिक्षण घेण्याचा आनंद दिला.
हे सर्व करीत असताना बालपणापासून आवडत असलेल्या सायकल चालविण्याच्या आवडीचा त्याला विसर पडला होता असे अजिबात नाही. उलट या सायकल चालविण्याच्या छंदामुळे आलेले अनुभव त्याने शब्दांच्या माध्यमातून आविष्कृत करून त्यांच्यातील साहित्यिक बीज सर्वांसमोर आणले. “एक पॅडल आनंदासाठी...” हे एका थक्क व्हायला लावणाऱ्या सायकल प्रवासाचे वर्णन करणारे पुस्तक आहे. ही सायकलवरची भ्रमंती देशाच्या विविध प्रदेशातील खडतर अशी वाटचाल आहे. सायकलची आवड छंदात रुपांतरित झाली त्याविषयी ते सांगतात त्याप्रमाणे, “पराग रांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 'सायकल टू रिसायकल' घनकचरा मोहिमेत भाग घेऊन गोव्यातील बारा तालुके, १८० गावे आणि नगरपालिकांमध्ये कचऱ्यासंदर्भात पाच दिवस जनजागृती करण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या सायकल प्रवासात गोवा सायकलिंग क्लब, साष्टी राईडर, स्लोप एण्ड बेण्ड, पॅडल एण्ड व्हिल्स ऑफ सिंधुदुर्गा, सायकलिस्टस असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आदी सायकलिंग संस्थेचा मोठा वाटा आहे. सदर संस्थांमधून असंख्य सायकलपटू मित्र मला भेटले आणि भेटत आहेत. त्यांच्यामुळे मला गोव्याबाहेर भारताच्या अजाण स्थळी सायकलने भटकायला मिळाले आणि मिळत आहे.” या सायकल प्रवासानेच मला साहित्यिक बनवले.
त्यासाठी गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांनी दैनिकात माझ्यासारख्या नवख्या लेखकावर विश्वास ठेवून जागा दिली. वर्षा गावकर यांनी पुस्तकाला समर्पक शीर्षक दिले. पत्नी संतोषीचे सहकार्य माझ्या भ्रमंती आणि लेखनाला प्रेरक ठरले. सायकलचा प्रवास करताना आलेले थरारक अनुभव गाठीशी बांधून घेत संकेत मार्गक्रमण करीत राहिले. ते प्रत्यक्षदर्शी अनुभव म्हणजेच ‘एक पॅडल आनंदासाठी’ हे पुस्तक आहे. गोवा मराठी अकादमीच्या आर्थिक सहाय्यातून वाचकापर्यंत पोहोचलेले.
संकेतच्या लिखाणात नाविन्य आहे. रंजकता आणि नर्मविनोद आहे. कुठलीही अलंकृतता भाषेत आढळत नाहीत. भाषेला सहज प्रवाह प्राप्त झालेला आहे. ती ओघवती आणि वास्तव आहे. अनुभवाची नितळता आणि प्रवासाचा थ्रिल तिला आहे. थेट विषयाला भिडल्यामुळे कोठेही फापटपसारा दिसत नाही. जे आहे, जसे आहे तसेच्या तसे उभे करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत दिसते. पुस्तकातील कोणताही लेख काढून वाचला तरीही त्यात वेगळा प्रदेश, वेगळी माहिती दिसेल. हे नुसतेच प्रवास वर्णन नाही तर प्रवासाच्या माध्यमातून घेतला गेलेला सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, नैसर्गिक आढावा त्यात आलेला आहे.
दुर्गम भागातून शेकडो किलोमीटरचा सायकलने प्रवास करतानाचे अनुभव अंगावर काटा आणतात. त्याचे लिखाण कोठेही बोजड नाही. मनाली ते लेह, मुंबई ते गोवा, कन्याकुमारी ते गोवा, राधानगरी, गगनबावडा, गोवा हंपी गोवा, रांगणागड वगैरे प्रदेशात त्याने केलेला सायकल प्रवास शब्दबद्ध केलेला आहे. संपूर्ण गोवा तर त्याने सायकल वरून बघितलेलाच आहे. कमी वयात त्याने आत्मसात केलेले कौशल्य त्यांच्यातील वैचारिक क्षमता दर्शविते. कृतिशील शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागृत केलेले निसर्गभान अचंबित करणारे आहे. त्यांचे लिखाण हे प्रत्यक्षदर्शी रसरशीत अनुभवाचे सार आहे. ते वाचताना वाचकाला प्रवासाची उर्मी येते. ती ठिकाणे अनुभवल्याचा भास होतो. अनुभव माणसाला उन्नत करतात. व्यक्तिमत्त्व विकसित करतात. आणि मुख्य म्हणजे जीवन आनंदाने कसे जगावे हे शिकवतात. संकेतच्या लिखाणातून हे सारेच जाणवते. महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावात जन्म, तर गोव्यातील वझरी पेडणे येथे शालेय जीवन व्यतीत केलेले संकेत नाईक एक भटके व्यक्तिमत्त्व. आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करताना ‘शिक्षक ते साहित्यिक’ हा प्रवास तेवढाच रंजक, धडपडी आणि अनुभवसमृद्ध आहे.
-पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)