पर्यावरण आणि मानवी आरोग्य

प्रत्येकाने पर्यावरणाप्रती असलेले आपले नैतिक वर्तन समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या गरजा किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गात बदल करताना तो अशा पद्धतीने करावा की जेणेकरून आपल्यासोबत इतर सजीवांना हानी पोहोचणार नाही.

Story: साद निसर्गाची |
15th December, 03:44 am
पर्यावरण आणि  मानवी आरोग्य

निसर्गाशी निगडित प्रत्येक घटकावर पर्यावरणीय बदलाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. मग तो शारीरिक असो, मानसिक किंवा सामाजिक. निसर्गातील कोणताच घटक पर्यावरणीय बदलांकडे दुर्लक्ष करुन आपले जीवन सुरळीतपणे व्यतीत करु शकत नाही, हे एक स्थापित सत्य आहे. वातावरण अनुकूल असल्यास एखादी व्यक्ती आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा पूर्ण वापर करू शकते. उलटपक्षी, प्रदूषित वातावरणामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो व त्यामुळे कित्येक आजारही बळावतात. 

'पर्यावरणाचे आरोग्य व संरक्षण' ही जागतिक समस्यांपैकी एक मानली जाते. यामध्ये, शहरीकरण व पर्यावरणीय आरोग्य, पाण्याची गुणवत्ता व आरोग्य, हवेची गुणवत्ता व आरोग्य, उद्योग व आरोग्य यासारख्या समस्यांचा समावेश होतो. 

मानवी आरोग्य व दूषित पाणी - 

दूषित पाण्यामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पाणी टंचाई, पाण्याचा अपुरा पुरवठा यासारख्या कारणांमुळे दूषित पाणी वापरण्याची संभावना वाढते तर औद्योगिक सांडपाणी, शेतीतून वाहून जाणारे पाणी यासारख्या पाण्याच्या प्रदूषित स्रोतांमुळे शुद्ध पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होतात. यामुळे विषमज्वर (टायफॉइड), पटकी (कॉलरा), आमांश (डीसेंट्री) यासारखे जलजन्य रोग पसरण्याचा धोका असतो. विकसनशील देशात, विशेषतः शहरी भागात पाण्याची गुणवत्ता राखण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यात आलेले अपयश, कचरा संकलन व कचरा विल्हेवाट लावणाऱ्या प्रणालीची अपूर्णता ही यामागील दोन मुख्य कारणे आहेत.

मानवी आरोग्य व वायू प्रदूषणाचा परिणाम - 

माणसाच्या आरोग्याला सततचा धोका कोणता असेल तर तो वायू प्रदूषणाचा. सद्याच्या घडीला, जीवाश्म इंधनापासून तयार होणारे उप-उत्पादक जसे कोळशावर चालणाऱ्या वीज केंद्रातून, मोटार गाड्यातून बाहेर पडणारा धूर हा वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत आहे. वायू प्रदूषक माणसाच्या श्वसनसंस्थेवर थेट हल्ला करतो. ज्यामुळे माणसाला दमा, क्षयरोग यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. विशिष्ट वायू प्रदूषकांमुळे ओझोनचा थर कमी कमी होत आहे. यामुळे त्वचेचा कर्करोग व मोतीबिंदू यासारखे आजार मोठ्या प्रमाणात आपले पाय पसरवत आहेत.

मानवी आरोग्यावर औद्योगिकीकरणाचा परिणाम -

कित्येक औद्योगिक वसाहती प्रक्रिया न करता सांडपाणी थेट समुद्रात, नदीत किंवा तलावात सोडतात. रासायनिक, भौतिक किंवा जैविक प्रदूषकांना पर्यावरणात सोडण्यासाठी योग्य नियोजन न केल्याने माणसाच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात. यामुळे जैवविविधतेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. औद्योगिक प्रदूषणामुळे शिसा, पाऱ्याची विषबाधा, सिलिकोसिस, त्वचारोग यासारखे आजार जडण्याची दाट संभावना असते. 

ऊर्जेचा मानवी आरोग्यावर परिणाम - 

ऊर्जा ही सामाजिक-आर्थिक विकासाची पूर्व-आवश्यकता आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे आणि वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे होणारे शहरी-वायू प्रदूषण; स्वयंपाक बनवण्यासाठी कोळसा आणि बायोमास इंधनांचा वापर केल्याने घरात होणारे वायू प्रदूषण, हृदय व रक्तवाहिन्या संबंधित व श्वसनाचे आजार निर्माण करतात. हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर होणारा अप्रत्यक्ष परिणाम हा जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूच्या पातळीत वाढ झाल्यामुळे होतो.  म्हणूनच, स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

प्रत्येकाने पर्यावरणाप्रती असलेले आपले नैतिक वर्तन समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या गरजा किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गात बदल करताना तो अशा पद्धतीने करावा की जेणेकरून आपल्यासोबत इतर सजीवांना हानी पोहोचणार नाही. पृथ्वीवरील प्रत्येक प्रजातीला जगण्याचा किंवा किमान जगण्यासाठी संघर्ष करण्याचा अधिकार आहे. पृथ्वीवरील वनस्पती आणि प्राण्यांनाही येथील संसाधने वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एखाद्या प्रजातीचा वापर करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार जरी असला तरी त्या प्रजातीचे अकाली विलोपन होऊ नये म्हणूनही आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने पर्यावरणीय नीतिमत्ता जपली पाहिजे.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)