एका पर्वाची अखेर...

भारताचे माजी पंतप्रधान आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ या आत्मचरित्रामध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक स्मरणात राहील. इतिहास मनमोहन सिंग यांचे कर्तृत्व सोनेरी शब्दांत लिहील.

Story: विशेष |
29th December 2024, 12:12 am
एका पर्वाची अखेर...

डॉ. वाय. के. अलघ यांनी ‘अत्यंत कमी लेखले गेलेले राजकारणी आणि अत्यंत प्रशंसले गेलेले अर्थशास्त्रज्ञ’ असा भारताचे १३ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला आहे. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे भारताचे पंतप्रधान होते. परंतु अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचे राजकारण्यात झालेले परिवर्तन ही एक चित्तवेधक कथा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) अस्तित्वात आली तेव्हा राजकीय परिस्थिती अत्यंत कठीण होती. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय होऊनही आपल्या विरोधात केलेल्या अपप्रचारामुळे दुखावलेल्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर यूपीएमध्ये चर्चेनंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यावर एकमत झाले. या सरकारला डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या कामगिरीमुळे २००९ च्या निवडणुकीतही यूपीएला यश मिळाले. वास्तविक पाहता, या आघाडी सरकारला आतून आणि बाहेरून अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते. अणुकरार प्रकरणात मनमोहन यांची वेगळी बाजू  पाहायला मिळाली. भारताच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या या कराराबाबत मनमोहन सिंग यांनी ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते की, या करारावर पुनर्विचार करणे शक्य नाही. हा एक सन्माननीय करार आहे, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आहे, आम्ही यावर मागे जाऊ शकत नाही. त्यांना हवे असल्यास ते पाठिंबा काढून घेऊ शकतात, असे मी डाव्या पक्षांना सांगितले आहे.  

मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कार्यकाळात महागाई वाढत गेली. त्यांच्या एकूण १,३७९ भाषणांपैकी त्यांनी ८८ भाषणांमध्ये महागाईवर भाष्य केले. मनमोहनसिंग एक अर्थतज्ज्ञ म्हणून महागाई नियंत्रणावर धोरणात्मक काम करत होते; पण याबाबत ते मौन बाळगत राहिल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकले नाहीत.

माजी आयएएस आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) संचालक प्रदीप के. लाहिरी यांच्या आत्मचरित्र ‘अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मेन: अ पब्लिक सर्व्हंट रिमेम्बर्स’ मध्ये मनमोहन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. त्यांच्या मते, मनमोहन सिंग यांचे भारतीय इतिहासातील योगदान पंतप्रधान म्हणून न राहता भारताचे अर्थमंत्री म्हणून अधिक स्मरणात राहील.

दिल्लीत फिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री मनमोहन सिंग वक्ते म्हणून सहभागी होणार होते. या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मनमोहन सिंग आपल्या कार्यालयातून थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले.  गुरशरण यांना कार्यक्रम स्थळी नेण्यासाठी एक उपसचिव त्यांच्या नवी दिल्लीतील घरी पाठवले. या अधिकार्‍याला वाटले की, भारताच्या अर्थमंत्र्यांच्या घरी अनेक सरकारी वाहने असतील. त्यामधून आपल्याला अर्थमंत्र्यांच्या पत्नीला कार्यक्रमस्थळी घेऊन जाता येईल. मात्र घरी पोहोचल्यानंतर अर्थमंत्र्यांच्या पत्नीने मंत्र्याकडे एकच सरकारी वाहन आहे आणि ते वाहन अर्थमंत्री स्वत: वापरतात, असे सांगताच त्यांना आश्चर्य वाटले.

मनमोहन सिंग यांचा जन्म सप्टेंबर १९३२ मध्ये सध्या पाकिस्तानात असणार्‍या गेह या छोट्याशा गावात झाला. आयुष्याची पहिली १२ वर्षे त्यांनी अशा गावात घालवली जिथे वीज नाही, पाण्याचा नळ नाही, शाळा नाही, दवाखाना नाही. गावापासून दूर असलेल्या उर्दू माध्यमाच्या शाळेत देशातील हा महान अर्थतज्ज्ञ शिकला. यासाठी त्यांना दररोज काही मैल पायपीट करावी लागत होती. ते रात्री रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करत असत.  अशा प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण, उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मनमोहन सिंग हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ राऊल प्रेबिश यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रात काम करत होते. तेव्हा त्यांना दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लेक्चररशिपची ऑफर मिळाली. सिंग यांनी ही ऑफर स्वीकारली आणि १९६९ मध्ये भारतात परतले. मनमोहन सिंग यांच्यासारखा अभ्यासू अर्थतज्ञ संयुक्त राष्ट्राची प्रतिष्ठित नोकरी सोडून भारतात का परतत आहे, असा प्रश्न डॉ. प्रीबिश यांना स्वाभाविकपणे पडला. याबाबत ते म्हणाले की, तुम्ही वेडेपणा करत आहात; पण कधी कधी वेडेपणाही शहाणा ठरतो.’  

फार कमी लोकांना हे माहीत असेल की जेव्हा डॉ. सिंग यांना हिंदीत भाषण करायचे असेे तेव्हा ते भाषण हिंदीत नाही तर उर्दूमध्ये लिहिले जायचे. कारण ज्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले ती उर्दू माध्यमाची शाळा होती. त्यामुळे उर्दू ही त्यांची पहिली भाषा बनली. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी असेही सांगितले की दिव्याच्या अंधुक प्रकाशात वाचल्यामुळे त्यांचे डोळे इतके कमकुवत झाले होते की ते फक्त मोठ्या अक्षरात लिहिलेली भाषणेच वाचू शकत होते.

 १९८५ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. माजी गृहसचिव सीजी सोमय्या यांनी त्यांच्या आत्मचरित्र ‘द ऑनेस्ट ऑलवेज स्टँड अलोन’ मध्ये मनमोहन आणि राजीव यांच्यातील नातेसंबंधातील एका घटनेचा उल्लेख केला आहे. राजीव यांनी मनमोहन यांच्या नेतृत्वाखालील नियोजन आयोगाचे वर्णन ‘विदूषकांची टोळी’ असे केले होते. याचे मनमोहन सिंग यांना इतके दु:ख झाले की ते नियोजन आयोगाचा राजीनामा देण्यास तयार झाले. सोमय्या त्यांच्या पुस्तकात लिहितात, ‘मी तासभर त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये असे समजावून सांगितले. माझा सल्ला त्यांनी मानला. पण राजीव गांधींच्या काळात ते दुर्लक्षित राहिले. नंतर तर  त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात आले.

 २२ जून, १९९१, शनिवार या दिवशी मनमोहन सिंग त्यांच्या   युजीसीच्या कार्यालयात होते. अचानक त्यांना फोन आला. त्याच दिवशी दुपारी पीव्ही नरसिंह राव पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी रांगेत होते. ते थेट मनमोहन सिंग यांना म्हणाले, ‘तुम्ही तिथे काय करत आहात? घरी जा आणि तयार व्हा आणि थेट राष्ट्रपती भवनात या.’ येथूनच मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

डॉ. मनमोहन सिंग यांनी ना लोकसभा निवडणूक जिंकली होती ना ते कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंधित होते. अत्यंत सामान्य घरात वाढलेले असूनही सलग दोन वेळा ते देशाचे पंतप्रधान बनले आणि सलग दहा वर्षे या पदावर राहून प्रतिकूल आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीत देशाला सावरण्याचे काम केले.  जवाहरलाल नेहरूनंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान होते ज्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली.  मनमोहन सिंग हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते. यशस्वी अर्थतज्ञ म्हणून त्यांचा कार्यकाळ कायम स्मरणात राहतो, पण पंतप्रधान म्हणून त्यांना तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही.

आर्थिक सुधारणांबाबत पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यात तुलना केली जाते. यामध्ये प्रथमदर्शनी मनमोहन सिंग त्यांच्या राजकीय गुरूसमोर डावे दिसत असतील, पण इतिहास मनमोहन सिंग यांचे कर्तृत्व सोनेरी शब्दांत लिहील. मनमोहन यांच्या लोकप्रियतेच्या जोरावरच २००९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसने जिंकली. विशेष म्हणजे यामध्ये शहरी मतदारांचे योगदान मोठे होते. याचा वैयक्तिक फायदा मनमोहन यांना घेता आला नाही, ही काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची वेगळी कहाणी आहे. मनमोहन यांनी १० जनपथशी नेहमीच व्यावसायिक संबंध ठेवले. या १० वर्षात मी गुरु शरण कौर यांना गुलाब किंवा पुष्पगुच्छ घेऊन रांगेत उभ्या राहिलेले कधी पाहिले नाही किंवा राहुल किंवा सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबाबतची उत्सुकताही दिसली नाही. मनमोहन यांच्याकडून काही निर्णयांना होणार्‍या विलंबामुळे यूपीए सरकार बदनाम झाले. परंतु या निर्णयांना उशीर होण्यामागे अनेक कारणे होती. अन्यथा, परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात ते खूप काही करू शकले असते.


रशिद किडवई,
नवी दिल्ली
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)