युपीएससी आणि ED-TECH

इथे कोणीही पहिल्या तीन प्रयत्नात परीक्षा पास होत नाहीत. टॉपर आलेले पण नापास होउनच पुढे पास सालेले असतात.

Story: यशस्वी भव: |
29th December 2024, 03:44 am
युपीएससी आणि ED-TECH

घरातून घरबसल्या युपीएससी, जीपिएससी यांची तयारी संगणकाच्या माध्यमातून नक्कीच करता येते. आजकाल युट्युबच्या माध्यमातून अनेक दर्जेदार व्हिडीओ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. जवळपास सर्वच व्हिडीओ व त्याचा कंटेन्ट चांगला आणि उपयुक्तच असतो. त्या माध्यमातून घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते परंतु घोड्याला पाणी स्वत:लाच प्यावे लागते. तसेच सर्वकाही उपलब्ध असून सुद्धा अभ्यास आपला आपल्यालाच करावा लागतो व लक्षात देखिल ठेवावा लागतो. 

युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्या अनेक वर्षांच्या युपीएससीच्या प्रश्नपत्रिका आहेत. पीडीएफच्या माध्यमातून त्यातील एक प्रश्नपत्रिका प्रथम (काहीही अभ्यास न करता) सोडवायला घ्या. गंमत अशी आहे की जर सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल, तर १०० पैकी ५ उत्तरे सुद्धा बरोबर येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि सर्वांचे असेच होते. एकदा का अभ्यासक्रमाची खोली आणि तपशिल लक्षात आला, की तोंडावर आपटल्यासारखे होते. यात नेमके कसे प्रश्न असतात. हे समजते. वाच‌नाची खोली (Depth) किती असली पाहिजे ते समजून येते. 

गेल्या १० वर्षात इंटरनेटवर फ्री असलेल्या ED-TECH म्हणजे Educational Technologyचा रापर अभ्यासासाठी करा. ‘अनअकॅडमी’, ‘बायजूस’ असे किमान २००० पेक्षा जास्त ED-TECH नेटवर उपलब्ध आहेत. उदा. प्रश्न बघा, ‘कोविड काळात भारतात कोणती इंडस्ट्री भरभराटीस आली?’, ‘बिकानेरकडून कारने कोणार्कला जाताना कोणत्या प्रकारची पिके लागतात?’, ‘मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे काय आहे?’, ‘स्कूलची बेल मेटलचीच का असते?’, क्वाशिओरकर हा रोग कशाच्या कमतरते मुळे होतो?’, ‘युरीआ कश्यामुळे बनतात?’, ‘हायड्रोजन बेस्ड इलेक्ट्रीक वेहिकलला टेलपाईप का नसतो?’ जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा लक्षात येते, की किती आणि काय काय वाचावे लागेल. 

इथे कोणीही पहिल्या तीन प्रयत्नात परीक्षा पास होत नाहीत. टॉपर आलेले पण नापास होउनच पुढे पास सालेले असतात. सर्व जुन्या प्रश्नपत्रिका अभ्यासून ध्यानात घ्याव्यात अन् नीट धोरण आखून ED-TECHच्या माध्यमातून घरच्या घरी अभ्यास करावा.

युपीएससी आणि लिखाणाची सवय 

युपीएससीच्या प्रिलीम परीक्षेमध्ये बहुपर्यायी विकल्प असतात. तीन चूक आणि एक बरोबर उत्तर असते. त्यामुळे या परीक्षेत लेखी सराव आवश्यक नसतो. परंतु जेव्हा विद्यार्थी मेन्स परीक्षेसाठी पात्र ठरतो, तेव्हा त्याला एकूण एक विविध विषयांवरील पेपर्स लेखी पद्धतीने सोडवण्यासाठी येतात. दिर्घोत्तरी प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरे देखिल मोठी मोठी असतात. त्यामुळे प्रिलीमकडून मेन्सकडे जाताना असा एक गोंधळ उडतो, की उत्तर जर लिहायचे असेल तर ते नेमके किती पाने लिहावेत? कुठे उत्तर संपवावे? खूपच कमी पण होता कामा नये व खूप जास्त देखिल उत्तर होता कामा नये. 

तज्ञांचे मार्गदर्शन या बाबतीत नक्कीच उप‌योगी पडेल. परंतु विषय असा आहे की, एवढे मोठे उत्तर लिहायची सवय आपणास आहे का? गंमत अशी आहे की, कॉलेजच्या, बोर्डाच्या पद्धतीने आपण जेव्हा मोठ्या मोठ्या प्रश्नांना उत्तरे लिहित असतो तेव्हा पुढे पुढे आपले हस्ताक्षर खराब होत जाते. कोणतीही उत्तरपत्रिका आपण बघितली की हे कसोशिने लक्षात येते की पहिले पान आणि शेवटचे पान पूर्णपणे वेगळे असते. आपल्याला वाटते की पेपरचेकर पूर्णपणे वाचेल की नाही, किंवा आपले मुद्दे एकदा यात आपणास आले की गुण मिळतील. कॉलेजच्या सिलॅबससाठी हे ठीक आहे परंतु येथे दीर्घोत्तरी प्रश्नाला मेद्देसूद आणि नीटनेटके तसेच तसेच वाचता येईल असेच करावे लागते. त्यामुळे शांतपणे व नीट विचारपूर्वक, वाचता येईल असे लिखाण करावे लागले. या साठी तज्ञांचे योग्य मार्गदर्शन युट्युबच्या व्हिडीओमधून जे टॉपर आलेले आहेत त्यांची मुलाखत बघा. काहीतरी टिप्स नक्कीच मिळतील. परंतु लिखाणाची जर सवयच नसेल, तर अजून मोठे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे लिखाणाची सवय भिनवा. 


अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि  करिअर समुपदेशक आहेत.)