आसावरी प्रसाद भिडे

भक्ती आणि प्रीतीचे संचित लेवून आसावरी भिडे यांची कविता भगवत भक्तीच्या वारीसाठी सिद्ध होत गुणगुणत राहाते.

Story: प्रेरक सर्जक |
29th December 2024, 03:50 am
आसावरी प्रसाद भिडे

त्या गोड गळ्याच्या, हसऱ्या चेहऱ्याच्या, बोलक्या डोळ्यांच्या. त्या तेवढ्याच स्वच्छ मनाच्या. हळव्या, भावूक, श्रद्धाळू आहेत. स्वामी समर्थांवर त्यांचा दृढ विश्वास. त्यांचा आशीर्वाद तिच्या जगण्याला आधार पुरवितो ही त्यांची मनापासूनची धारणा आहे. जे काही जीवनात घडते त्याला त्यांचीच प्रेरणा कारणीभूत आहे, असे त्यांना वाटते. त्या आहेत सौ. आसावरी प्रसाद भिडे. पाळी गोवा येथील स्व. विष्णू भावे यांची द्वितीय कन्या. पूर्वाश्रमीच्या हेमा विष्णू भावे. निसर्गाच्या कुशीत त्यांचे बालपण गेले. झुळझुळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ताल दिला. परिसराची नादमयता त्यांच्या नसानसात भिनून राहिली. त्यांची कविता इथूनच जन्मली. अध्यात्म आणि तरल भावभावनांचा मिलाफ त्यांच्या कवितेतून अनुभवता येतो.

त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी, संयत आणि संस्कारशील असे आहे. पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या त्या ढवळी फोंडा येथील एस.एस.समिती आय.वी.बी.डी विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामधून शास्त्रीय गायनाच्या तीन परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळविलेले आहे. त्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध गायिका सौ. संगीता बापट, गोव्यातील ज्येष्ठ गायक स्व.श्री.लाडू गावणेकर, श्री. दामोदर च्यारी यांचे मार्गदर्शन लाभले. कविता, चारोळी, गायन, सूत्रसंचलन तसेच कवितांना चाली लावून संगीतबद्ध करून त्या सादर करण्यातील त्यांचा आनंद वाखाणण्याजोगा असतो. 

आजपर्यंत त्यांनी लेखन, वाचन, गायनात केलेली प्रगती अनुभवताना विविध स्तरावर आयोजित केलेल्या स्पर्धांमधून त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत. बिल्वदल परिवार आयोजित गोव्यातील पहिल्या शिळ वादन स्पर्धेच्या त्या विजेत्या आहेत. राज्य स्तरीय चांद्रयान स्पर्धेत ‘स्पर्श’ गोवा मराठी अकादमी आयोजित राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेमध्ये ‘बहर’ या कवितेसाठी साहिल प्रकाशन आयोजित सिंधुदुर्ग आणि गोवा राज्य मर्यादित कविता सादरीकरण स्पर्धेमध्ये दुसरे पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. 

स्वामी समर्थ मठ, शिवोली येथे घेण्यात आलेल्या ‘स्वामी समर्था माझी आई’ या विविध कलागुण दर्शन स्पर्धेतही पारितोषिक मिळाले आहे. खास शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान कविता सादरीकरण स्पर्धेत त्यांनी स्वलिखित कविता सादर करून दुसरे बक्षीस मिळविलेले आहे. त्यांच्या लेखन कौशल्याची दखल गोव्याबाहेरही घेण्यात आलेली आहे. प्रभावती साहित्य समूह, पुणे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात ‘काव्य शिरोमणी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध साहित्य संमेलने, कविसंमेलनामधून निमंत्रित कवयित्री म्हणून त्या सातत्याने सहभागी होत असतात. विविध वर्तमानपत्रे, दिवाळी अंक, मासिकांमधून त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. लेखन, संगीत, गायना बरोबरच त्यांना कीर्तन सादरीकरणात रुची असून राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प.श्री. सुहासबुवा वझे यांच्याकडे त्या कीर्तन शिकत आहेत. बिल्वदल परीवार आयोजित किर्तन संमेलनात त्यांनी आपले किर्तन सादर केले होते. विष्णू स्मृती प्रतिष्ठान, गोवा तसेच इतर विविध संस्थांच्या त्या सक्रिय सदस्या आहेत.

पेशाने शिक्षिका, तरीही जगण्याची अर्थपूर्ण उंची वाढविणाऱ्या अनेक आनंददायी, कौशल्यपूर्ण उपक्रमशील कृतीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणजे आकाशवाणी पणजीवर त्यांनी केलेले काम! ‘भावस्पर्श’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह अपेक्षा उंचावणारा आहे. फक्त पंचवीस कवितांचा हा संग्रह. भावोत्कटता हा या संग्रहाचा स्थायीभाव असून गुरूस्थानी असलेल्या व्यक्तीविषयी असलेली आपुलकी, प्रेम आणि त्याहीपेक्षा त्यांच्या विचारांवर असलेली अढळ निष्ठा इथे अधोरेखित होते. श्री स्वामी समर्थ हे कवयित्रीचे आराध्य दैवत. कवितेतून त्यांनाच प्रथम वंदन करून त्या पुढे आपल्या वडिलांवर असलेल्या उत्कट आणि अतूट विश्वासाबद्दल लिहितात. आई तर भावजीवनाचा अविभाज्य घटक. तिच्याशिवाय कवित्वाला पूर्णत्व येणार तरी कसे?

सदा संकटी तारती स्वामी राया
ठेवा दृढ विश्वास नी माया

असे आवाहन करून, संस्कार विचारांची शिदोरी याच सकारात्मक भावनेने उलगडते. कवितांची भाषा साधी सरळ, अनलंकृत आणि तेवढीच स्पष्ट, प्रांजळ आहे. नितळ पाण्याच्या प्रवाहात जसे प्रवाळ त्यातील बारकाव्यासकट दिसतात, तशीच ही कविता कवयित्रीच्या स्वच्छ, आरस्पानी, प्रामाणिक भावनांचे प्रतिबिंब अधोरेखित करते. 

स्वामी समर्थ आणि आईवडील यांचा कवयित्रीच्या जीवनात अग्रक्रम आहे. स्वामी तर अणुरेणूत, कणाकणात, व्यक्तिमनात, जळीस्थळी भिनलेले आहेत. कठीण प्रसंगी तेच तारतील, भवसागर तेच तरुन नेतील. स्वामी म्हणजे अढळता, स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे पावित्र्य, स्वामी म्हणजे जीवनाची आशा, स्वामी म्हणजेच आशीर्वाद! संकटात तारणारे, एकटेपणात साथ देणारे, मनात सकारात्मक भाव जागविणारे ते स्वामी त्यांच्यावरील श्रद्धेतूनच हा काव्यसंग्रह उदयास आला आहे. स्वामी समर्थ कवयित्रीची ‘श्रद्धा’ तर तिचे वडील ‘बाबा’हा तिचा अटल विश्वास आहे! बाबा हयात नाहीत तरीही ते आसपास आहेत. आपल्यावर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. ते देहरूपाने सभोवताली वावरत असताना तिला दिसत नाहीत मात्र ते तिच्या जगण्याला व्यापून आहेत. त्यांची उणीव हृदयात काहूर उठवते, डोळ्यात असावे आणते, आठवणीतून अस्वस्थ करते, एकटेपणाची वेदना देते, मन हळवं करते.

भक्ती आणि प्रीतीचे संचित लेवून आसावरी भिडे यांची कविता भगवत भक्तीच्या वारीसाठी सिद्ध होत गुणगुणत राहाते.

गीतातील चैतन्य मिळावे
गीता मधुनी भाव कळावे
सूर जुळूनी सुरांचे त्या
सुमधूर ऐसें गीत व्हावे

ती कृतार्थ आहे... तृप्त आहे कारण आठवणींची सोबत घेऊन ती वर्तमान सजवत आहे. या कवितेला आशेची किनार आहे तशीच ती निरागस स्वत्व जपणारी आहे. अध्यात्माची सशक्तता आणि मांगल्याचा ध्यास घेऊन ती वाटचाल करत आहे. तिच्या प्रत्येक शब्दात आठवणींचा दरवळ आहे. 


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)