ज्येष्ठांकडून, आपल्या समकालीन मित्रांकडून तसेच लहानांकडूनही शिकायला खूप मिळाले. फक्त शिकण्याची असोशी हवी. उत्कट इच्छा हवी.
आकाशवाणीच्या वृत्त विभागाला पत्रकारांची गरज असते. साप्ताहिक वृत्त आढावा नावाचा एक कार्यक्रम रविवारी सकाळी प्रसारित होतो. त्याचं ध्वनीमुद्रण शनिवारी संध्याकाळी होतं. त्यात news and views असतात. आठवड्याच्या बातम्यांचं विश्लेषण त्यात असतं. ते करायला पत्रकारांना मुभा असते. आम्ही कमेंट्स देऊ शकत नाही. तरीही पत्रकार संहिता घेऊन येतात तेव्हा आम्ही ती बारकाईने वाचतो, संपादित करतो, कोंकणीचं गंध लेपन करतो, भाषा वा शेरा आक्रमक असेल तर तो सौम्य करतो वा बदलण्याची विनंती पत्रकाराला करतो. कारण आकाशवाणीची एक संहिता असते. वाऱ्यावर जाणारा स्पोकन वर्ड असतो त्याला या संहितेचं पालन करावं लागतं.
प्रकाश कुर्डीकर नियाळ वाचायला यायचे. ते मला लहानपणापासून ओळखत. म्हार्दोळचे जावई. हसत खेळत वातावरणात त्यांचं ध्वनीमुद्रण कधी झालं कळतच नसे. नंतर वृत्त संपादक सतीश नायक म्हणायचे, “अरे चल, गप्पा फार झाल्या, बातम्या तयार करूया आता.” विभाग खालच्या मजल्यावर होता. खिडकीतून स्कूटर पार्क करताना पत्रकार दिसत. उमेश म्हांबरो आला हे स्कूटरच्या आवाजावरून व त्याच्या आवाजावरून कळे. “आरे मुकेश थळी, कोंकणीवादी” असा बोवाळ करत म्हांबरो स्कूटर पार्क करायचा. न्यूज कक्षात प्रवेश केल्याबरोबर तो सामोसे, भक्कम पेढे नाही तर पाव व तळलेल्या मिरच्या वगैरेचा पुडा उसवत म्हणायचा, “घे रे मुकेश.” नंतर पत्रकार परिषदेला आपण मंत्र्यांना प्रश्न विचारून कसे ट्रॅप केले ते सांगत. उमेश कोंकणी चळवळीत असल्याने मला फार पूर्वीपासून ओळखत होता. नंतर तो मुंबई आकाशवाणी केंद्रावर नैमित्तिक न्यूज रीडर म्हणून बातम्याही वाचायचा. कुठला तरी मुद्दा काढून वाद उकरून तो आपलं प्रेम व्यक्त करत असे.
गुरूदास सावळ आणि प्रकाश कुर्डीकर हे सिनियर पत्रकार असल्याने गोव्याच्या मुक्तीनंतरच्या राजकीय उत्क्रांतीचे व क्रमवार घटनांचे ते रेडी रेकनर होते. बातम्या लिहिताना कधीही गरज लागली तर संदर्भासाठी, तारखेसाठी वा निश्चितीसाठी आम्ही त्यांना फोन करत होतो. सावळजी व प्रकाशजी मला लहानपणापासून ओळखत. त्यांचं आकाशवाणी स्टुडिओत येणं आम्हांला बरं वाटे. सावळजी मितभाषी. कमी, थोडक्यात मोजून मापून पण पक्कं बोलत. काही विचारलं तर आत-बाहेर न करता आढेवेढे न घेता राजकारणाची माहिती देत. त्यांचं हातांनी लिहिलेलं अक्षर बारीक होतं तरी वाचनीय असायचं. प्रकाशजी मोकळेपणे आमच्यासारखे साभिनय बोलणारे. या दोघांचं प्राकृतिक हास्य मला आवडायचं. समाचार आढावा लेखनात त्यांची हयातभर केलेल्या पत्रकारितेची पक्वता दिसे.
पत्रकार संजीव वेरेकर अधेमधे येत. विधानसभा कामकाज नियाळ करायला ते येत. ते आपल्या आवाजात आढावा वाचत. त्यांच्या कथनाला नीज कोंकणीचा एक सुगंध होता. ते माझ्या बरोबर कोंकणी चळवळीत होते त्यामुळे त्यांचं भाषण, निवेदन छान असायचं. नंतर त्यांचे विनोद वगैरे असत. मधूनच काव्यमय टोमणे मारून ते जात. किंवा हसवून तरी जात. वातावरण हलकं करत. उपहासात्मक खेळकर हास्यकारंजे फुलवण्याची कला संजीवला अवगत होती. जगदीश वाघ, र. वि. प्रभुगांवकर, गुरूदास सिंगबाळ हे विमुक्त गोव्यातील प्रथम फळीचे पत्रकार. त्यांचं ध्वनीमुद्रण आम्ही त्यांचा आब व आदर राखून करत. सिंगबाळ हे इंडियन एक्सप्रेसमध्ये होते. ते आमच्यात सहज मिक्स होत. त्यांचं संभाषण इंग्रजीतूनच चाले. गंमतच वाटायची. बोलताना जाणा मरे तू असं कोंकणीत म्हणतात त्या लयीत ते you see, you see असं अनुनासिक सुरांत म्हणत. तसं बोलताना ते आपल्या हाताचं बोट पुढं आणून फिरवत. सर्वांची सादरीकरणाची शैली वेगळी. वामन प्रभू यायचे. त्यांचं अक्षर काळ्या शाईच्या बॉल पेननं लिहिलेलं. सुंदर. जास्त करून टी शर्टांत असत. कायम हास्यधारी. आजही तसेच. त्यांची वाणी प्रवाही होती.
ज्येष्ठांकडून, आपल्या समकालीन मित्रांकडून तसेच लहानांकडूनही शिकायला खूप मिळाले. फक्त शिकण्याची असोशी हवी. उत्कट इच्छा हवी.
मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,
कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)