चमत्कारांनी भरलेल्या अद्भुत पण आश्चर्यकारक अश्या निसर्गाच्या किमया याची देही याची डोळा नक्कीच पाहायला हव्यात. आपल्या सुंदर अश्या गोव्यात यां निसर्गाच्या किमया कुठे दिसून येतात? वाचा आजच्या लेखात.
नैसर्गिक जग हे असंख्य चमत्कारांनी भरलेलं जग आहे. या ना त्या कारणांमुळे ते आपल्याला नेहमीच चकित करत असतं. कधी जंगल काळ्याकुट्ट अंधाराला चिरत फ्लोरोसेंट-हिरव्या रंगाने लकाकू लागतं तर कधी समुद्राचं पाणी चांदण्याला न जूमानता निळसर-हिरव्या रंगानं चकाकू लागतं. कधी इथला पतंग कोशातून बाहेर पडल्यानंतर काहीच न खाता जगतो तर कधी मोहक, सुंदर, आकर्षक फुलपाखरू विषधारी निघते. सगळ्यात जास्त आश्चर्य तेव्हाही होतं जेव्हा एखादी बुरशी काळ्याकिट्ट अंधारात टॉर्च मारताच धूर सोडताना पहायला मिळते. नवल म्हणजे या मागची वैज्ञानिक कारणेही तितकीच चकित करणारी असतात.
रात्रीच्या वेळी तुम्ही दक्षिण गोव्यातील बेताळभाटी किंवा पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर गेल्यास तुम्हाला एक विलक्षणीय नजारा पाहायला मिळू शकतो. तो म्हणजे समुद्राचे चमकणारे पाणी! समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म वनस्पतीमुळे, म्हणजेच 'फायटाॅप्लेंकटन' मुळे आपल्याला हा चमत्कार पहायला मिळतो. ही सूक्ष्म वनस्पती कार्बन-डायऑक्साइड शोषून घेत प्राणवायू बाहेर सोडते. रात्रीच्या वेळी समुद्रात निळ्या-हिरव्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करण्यास हीच वनस्पती कारणीभूत असते.
पश्चिम घाटरांगेत अनुभवायला मिळणारे लखलखणारे जंगल ही अशीच एक निसर्गाची किमया. पावसाळ्यात, गोव्यातील पश्चिम घाटात, विशेषतः म्हादई अभयारण्यात रात्री भटकंतीसाठी गेल्यास तुम्हाला ह्या जैव-प्रकाशमानतेचा आनंद लुटता येईल. यामागचे कारण म्हणजे मायसेना जेनस बुरशी. मायसेना जेनस ही विशिष्ट प्रकारची अळंबी ल्युसिफेरिन, ल्युसिफेरेस व प्राणवायू यांच्यातील रासायनिक रीएक्शनमुळे जैव-प्रकाशमानता निर्माण करते. ह्या जैव-प्रकाशमानतेमुळे बिजाणू पसरविणारे किटक आकर्षित होतात. पुनरुत्पादनासाठी हे नैसर्गिक आकर्षण अतिशय महत्त्वाचे असते.
आपल्या संपूर्ण जीवनाच्या कार्यकाळात जगभरात आनंद पसरविणारा, फुला-फुलांवरून फिरणारा लहानसा पण निसर्गाचा असाच एक अविभाज्य घटक म्हणजे लेपिडाॅप्टेरा. लेपिडाॅप्टेरा या कीटकांच्या प्रजातीमध्ये फुलपाखरू, पतंग व स्किपर्सचा समावेश होतो. लहान आकार, नाजूक अंगयष्टि व विविधरंगी पंखांमुळे हा जीव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. लेपिडाॅप्टेरामध्ये आकर्षित करण्यासारख्या जशा अनेक बाबी असतात तशाच एखाद्याला चकीत करण्यासारख्याही कित्येक गोष्टी असतात. असाच एक आश्चर्यचकित करणारा पतंग म्हणजे लुना पतंग. हिरवे पंख आणि पांढऱ्या शरीराच्या ह्या पतंगाचे सुरवंटही हिरव्या रंगाचे असतात. लुना पतंगाला 'अमेरिकन मून मॉथ' या नावानेही ओळखले जाते. मून मोथ पतंगाची एक खासियत आहे. हा पतंग कोशातून बाहेर आल्यानंतर म्हणजेच पतंगाच्या रुपात आल्यानंतर काहीच खात नाही. हा पतंग जवळजवळ एक ते दीड आठवडाच जिवंत राहू शकतो. या काळात लुना पतंग काहीच खात नाही कारण खाण्यासाठी त्याला तोंडही नसते व पचन करण्यासाठी त्याला पचनसंस्थाही नसते.
असाच चकीत करणारा आणखीन एक मोहक व रंगबेरंगी लेपिडाॅप्टेरा म्हणजे टायगर प्रजातीचे फुलपाखरू. केशरी, निळसर-पांढरा, तपकिरी, पांढरे-काळे पट्टे असलेल्या टायगर फुलपाखरांच्या प्रजाती दिसायला खूप सुंदर व आकर्षक असतात. इतकी सुंदर व आकर्षक दिसणारी ही टायगर प्रजातीची फुलपाखरं विषारी असतात असं म्हटलं तर? आश्चर्याचा धक्का बसेल ना? नक्कीच बसेल. विषधारी फुलपाखरु हा खरंतर निसर्गाचा चमत्कारच आहे. आपल्या जीवावर टपलेले शत्रू जसे पक्षी, सरडे, साप, कोळी यासारख्या भक्षकांपासून स्वतः चे रक्षण करण्यासाठी ही फुलपाखरे रुईसारख्या विषारी रोपाची पाने खातात व जाणीवपूर्वक स्वतः च्या अंगात विष भिनवून घेतात. अंगात भिनवून घेतलेल्या विषामुळं ही फुलपाखरं खायला बेचव लागतातच शिवाय या विषधारी फुलपाखरांना खाल्ल्याने भक्षकाला उलट्या, भोवळ येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या फुलपाखरांची चव घेतलेला भक्षक पुन्हा कधीच त्यांच्या वाटेला जात नाही. एकदा चव घेतल्यानंतर भक्षक या फुलपाखरांचे रंग नीट लक्षात ठेवतात. अन् पुढे कधीही असे फुलपाखरू सहजरीत्या जरी सापडत असले तरीही भक्षक पुन्हा कधीच त्यांची शिकार करत नाही. या विषधारी फुलपाखरांमध्ये प्लेन टायगर, स्ट्राइप्ड् टायगर, ब्लू टायगर, ग्लॉसी टायगर या फुलपाखरांचा समावेश होतो.
पश्चिम घाटात आपल्याला असंही एक अळंब दृष्टीस पडतं जे अंधारात टॉर्च मारल्यावर धूर सोडतं. या अळंब्याला ब्रॅकेट फंगस या नावाने ओळखले जाते. ब्रॅकेट फंगस किंवा ब्रॅकेट बुरशी लाकडावर, मेलेल्या किंवा जिवंत झाडावर आसरा घेते. ही बुरशी धुराच्या रुपात आपले बीजाणू हवेत सोडते. किट्ट काळख्या अंधारात एखाद्या प्रकाशाच्या झोतात निरीक्षण केल्यास आपल्याला ही किमया पाहायला मिळते. पुनरुत्पादन, फैलाव आणि जगण्यासाठी ब्रॅकेट बुरशी आपले बीजाणू हवेत उत्सर्जित करत असतात.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)