बार्देश : पर्यटकांना त्रास देणाऱ्या २५ टाऊट्सवर कळंगूट पोलिसांची धडक कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th December 2024, 04:42 pm
बार्देश : पर्यटकांना त्रास देणाऱ्या २५ टाऊट्सवर कळंगूट पोलिसांची धडक कारवाई

म्हापसा  :  नविन वर्षाच्या स्वागतासाठी कळंगुटमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सोमवारी सकाळी कळंगुट पोलिसांनी पर्यटक पोलिसांच्या मदतीने २५ टाऊटस्ना पकडले. या टाऊटस् दलालांवर पर्यटन खात्याने दंडात्मक कारवाई केली व दंड म्हणून एकूण १.२५ लाखांची  रक्कम वसूल केली.

बार्देश तालुक्यातील विशेषतः कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कळंगुट, बागा, सिकेरी व कांदोळी या समुद्रकिनारी भेट देणार्‍या पर्यटकांना टाऊट्सकडून नेहमीच त्रास होतो. वेळोवेळी पोलिसांकडून बेकायदा व्यवसाय करणार्‍या या दलालांची पोलिसांकडून धरपकड केली जात होती.

तरीही कळंगुट समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात या दलालांचा वावर सुरूच होता. कळंगुट समुद्रकिनारी नविन वर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍या पर्यटकांना या दलालांकडून त्रास होऊन नये, यासाठी कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक व पर्यटक पोलीस निरीक्षक जतिन पोतदार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पोलीस स्थानकांच्या कर्मचार्‍यांनी विशेष मोहिम हाती घेतली.

या मोहिमेंतर्गत एकूण २५  दलालांना पकडण्यात आले. चौकशी करून या दलालांना पोलिसांनी पर्यटन खात्याच्या संचालकांसमोर त्यांना हजर केले. तेव्हा पर्यटन कायद्यानुसार प्रत्येकी ५ हजार रूपये प्रमाणे १ लाख २५ हजार रूपये पर्यटन खात्याकडून या टाऊट्सकडून दंडात्मक रक्कम म्हणून वसूल करण्यात आली.  

गोव्यात भेट देणार्‍या पर्यटकांमध्ये कळंगुट हे सुरक्षित आणि आनंददायी ठिकाण असल्याची भावना निर्माण व्हावी, तसेच नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर या उत्सवात बाधा आणणार्‍या घटना रोखण्यासाठी व टाऊट्सच्या उपद्रवाला आळा घालण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून ही मोहिम राबवण्यात आली.

हेही वाचा