आयसीएआर वैज्ञानिक डॉ. श्रीपाद भट्ट यांची माहिती
पणजी : हवामानाचा फटका नारळ उत्पादनाला बसला आहे. अनियमित पावसामुळे नारळाचे उत्पादन कमी झाले आहे. केवळ गोव्यातच नाही तर केरळ आणि कर्नाटकातही नारळाचे उत्पादन कमी आहे, असे भारतीय कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीपाद भट्ट यांनी सांगितले.
यावर्षी नियमितपणे पाऊस पडत नाही. जून आणि जुलैमध्ये जास्त पडला. सप्टेंबरमध्ये घट झाली. मात्र, आता तापमान वाढू लागले आहे. हवामान अधूनमधून दमट असते. याचा परिणाम नारळ पिकावर झाला आहे.
वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव तसेच कीटकांचा प्रादुर्भाव आहेच. भारतीय कृषी संशोधन केंद्र हवामान आणि पिकांवर संशोधन करते. संशोधकांनी नोव्हेंबरमध्ये नारळाच्या उत्पादनातही घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळमध्ये मोठ्या नारळाचा दर ४७ रुपये आहे.
उन्हाळ्यात उष्णतेची लाट आली होती. याचा परिणाम नारळावर झाला. तापमान वाढ किंवा उकाडा वाढल्यास पिकावर परिणाम होतो.
कासारगोड येथील केंद्रीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक के. भालचंद्र हेब्बर यांनी यावर संशोधन केले आहे. यावर्षी गोव्यासह कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हवामान बदलाचा फटका नारळाला बसला, असा त्यांनी निष्कर्ष त्यांनी काढला, असे डॉ. श्रीपाद भट्ट यांनी सांगितले.
उत्पादन कमी झाल्यास दरवाढ
केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात नारळाचे उत्पादन जास्त होते. केरळमधून गोव्यात नारळ आयात केले जातात. इतर राज्यांत नारळाचे उत्पादन कमी झाल्यास गोव्यातही नारळ येण्याचे प्रमाण कमी होते. दरवाढीमागे हेही एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.