अठरा खनिज डंपसाठी १७४ जण स्पर्धेत

लिलाव प्रक्रिया सुरू; सुमारे ४०० कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:31 am
अठरा खनिज डंपसाठी १७४ जण स्पर्धेत

पणजी​ : राज्यातील १८ खनिज डंपचा लिलाव करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून, त्यासाठी तब्बल १७४ जण स्पर्धेत आहेत. या डंपवर सुमारे ५० मिलियन टन खनिज माल असून, त्यातून सरकारच्या तिजोरीत सुमारे ४०० कोटी रुपये येऊ शकतात, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

काही खाणपट्ट्यांच्या लिलावानंतर सरकारने आता डंप लिलावाकडे लक्ष वळवले आहेत. पहिल्या टप्प्यात १८ डंपचा लिलाव करण्याची प्रक्रिया खाण खात्याने सुरू केलेली आहे. त्यासाठी आतापर्यंत १७४ जणांनी निविदा कागदपत्रे खरेदी केली आहेत. निविदा प्रक्रिया पुढील काहीच दिवसांत सुरू होईल, असे गाड यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ज्या १८ डंपचा लिलाव करण्याचे निश्चित करण्यात आले आहे, त्यात सुमारे ५० मिलियन टन इतका खनिज माल आहे. त्यातून विविध करांच्या माध्यमातून सरकारला सुमारे ४०० कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, गेल्या बारा वर्षांपासून बंद असलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणच्या खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून सरकारला अपेक्षित महसूलही मिळालेला आहे. त्यानंतर सरकारने आता अनेक वर्षांपासून विविध भागांमध्ये पडून असलेल्या डंपच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. 

हेही वाचा