म्हापसा : गौरावाडा कळंगुट येथे आग लागल्याने दोन शॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नविन वर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री पासून सकाळ पर्यंत समुद्रकिनारी फटाक्यांची आतिषबाजी होत होती. या फटाक्यांची ठिणगी शॅकवर पडल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय मेल्विन सिक्वेरा व कॅटरिना फर्नांडिस या शॅक मालकांनी व्यक्त केला आहे.सदर घटना बुधवारी १ जानेवारी रोजी सकाळी ६.४५ च्या सुमारास घडली. वेळीच आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. फक्त शॅकच्या दर्शनी भागातील साहित्य जळाले.
यामध्ये खुर्च्या, टेबल, बेड व इतर लाकडी सामान, विद्युत साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा, बांबू प्लास्टीक समान तसेच माडाची झावळे यांचा समावेश आहे. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा सुमारे ५ लाखांच्या घरात असल्याचा अंदाज असून शॅक मालकांनी दुपारी उशिरा पर्यंत अग्निशमन दलाकडे नुकसानीचा अहवाल सादर केलेला नव्हता.
दुर्घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शॅकचे कामगार तसेच आजूबाजूचे व्यावसायिक आणि लोकांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणून विझवली. पिळर्ण अग्निशमन दलाचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र शेटये यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.