प्रदेश अध्यक्ष तानावडेंसह विनय तेंडुलकर, अॅड. नरेंद सावईकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पणजी : नवीन वर्षात मंत्रिमंडळात बदल झालेला पहायला मिळेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संघटनात्मक निवडणुकीविषयी माझी चर्चा झाली, अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह माजी खासदार विनय तेंडुलकर व अॅड. नरेंद्र सावईकर यांनी आल्तिनो बंगल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सुद्धा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संघटनांतर्गत निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे सांगतानाच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत सदानंद शेट तानावडे यांनी भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले. माजी खासदार विनय तेंडुलकर आणि अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सदिच्छा भेट असल्याचे सांगतानाच चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला. मंत्र्यांसह भाजपच्या तीन नेत्यांनी एकाचवेळी भेट घेतल्याने भेटी मागचे गूढ वाढले आहे.
नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अन्य कोणताही विषय नव्हता. इतर विषयावर चर्चा झाली तरी सर्व काही सांगता येणार नाही, असे माजी खासदार विनय तेंडुलकर यानी सांगितले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनीही सदिच्छा भेट असल्याचे सांगताना तपशील उघड करण्यास नकार दिला.
१० जानेवारी पूर्वी मंडळ अध्यक्षांची निवडणूक होणे आवश्यक आहे. येत्या निवडणुकीत पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संघटनांतर्गत निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.