सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शनाचा ४ जानेवारीला शेवटचा दिवस

५ जानेवारीला सी कॅथेड्रलमधून आणणार बॅसिलिकात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd January, 12:04 am
सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शनाचा ४ जानेवारीला शेवटचा दिवस

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याचा ४ जानेवारीला शेवटचा दिवस आहे. आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने गर्दी वाढली आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता, सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष सी कॅथेड्रल चर्चपासून बॅसिलिकापर्यंत मिरवणुकीत आणले जाईल. यानंतर प्रार्थना सभा होईल. प्रार्थना सभा आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असे फादर हेन्री फाल्काव यांनी सांगितले.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शन सोहळ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. दर दहा वर्षांनी होणारा हा सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. ख्रिसमसच्या आधी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत दर्शनाचा वेळ होता. वाढत्या गर्दीमुळे, ख्रिसमसनंतर अवशेष पाहण्याची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली होती आणि आता ती सकाळी ६ ते संध्याकाळी ७ पर्यंत आहे. फादर हेन्री फाल्काव म्हणाले की, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषाचे सर्वांना दर्शन घेता यावे यासाठी शासन व प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली आहे. अवशेष दर्शन तसेच पायाभूत सुविधांमुळे कोणाचीही गैरसोय होत नाही. पायाभूत सुविधांचे सर्वांनी कौतुक केले आहे.

दररोज दोन लाख लोकांची भेट

नाताळपर्यंत दिवसाला ३० ते ४० हजार लोक भेट देत होते. नाताळनंतर गर्दी वाढू लागली. आता दररोज दोन लाख लोक दर्शनाला येतात. परदेशी पर्यटकही यात आहेत. नवीन वर्षांत देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. चर्चच्या म्हणण्यानुसार व्हीलचेअर आणि निवास व्यवस्था यामुळे गर्दी वाढण्यास मदत झाली.

हेही वाचा