अनेक घटना न्यूज कक्षात होतात. वेळ अगदी कमी पण अचूकता सांभाळावी लागते. काळजी घ्यावी लागते.
आकाशवाणीची दोन प्रमुख बुलेटीन, इंग्रजीतून आणि हिंदीतून दिल्ली मुख्यालयातून म्हणजे समाचार विभागातून देशभर प्रसारित होतात. मुख्य बुलेटीन सकाळी, दुपारी आणि रात्री असतात. जी अर्ध्या तासाची असतात. प्रत्येक तासाला पाच मिनिटांची हिंदी आणि इंग्रजी बुलेटीन प्रसारित होतात. ही सर्व बुलेटीन्स थोड्याच वेळात आकाशवाणीच्या वेबसाईटवर ऐकायला व वाचायलाही मिळतात. अर्ध्या तासाच्या बुलेटिनमध्ये विविध प्रांतांतील रिपोर्टरांचे व्हॉयस ओव्हर तसंच कार्यक्रमात झालेल्या मंत्र्यांच्या भाषणांचे तुकडे वाजवले जातात.
प्रत्येक राज्याच्या राजधानी शहरात प्रादेशिक समाचार विभाग असतो. गोव्यात या विभागाचं काम कोंकणीतून चालतं. मी इथं तीस वर्षं काम केलं. इथं सकाळी दहा मिनिटांचं राष्ट्रीय बुलेटीन व पाच मिनिटांचं प्रादेशिक बुलेटीन असतं. संध्याकाळी दहा मिनिटांचं प्रादेशिक बुलेटीन तर पाच मिनिटांचं राष्ट्रीय बुलेटीन असतं. ही सर्व बुलेटिन (ऑडियो व मजकूर रूपात) वेबसाईटवर नंतर उपलब्ध होतात. एका मिनिटाला सरासरी शंभर शब्द वाचले जातात. पाच मिनिटाला पाचशे तर दहा मिनिटाच्या बुलेटीनमध्ये १००० शब्द वाचले जातात.
प्रादेशिक बातमीपत्र तयार करणं अथवा राष्ट्रीय बुलेटीन अनुवादीत करणं तेही दोन तासात ही काय थट्टा नव्हे. अनुवाद कौशल्यावर हुकुमत पाहिजे. आता संगणकावर कंपोजिंग करणं शक्य झालं आहे. पण या तंत्रज्ञानावर पूर्ण विसंबून राहणं म्हणजे फजितीला बोलावणं देणं. मी न्यूज रीडरना कायम सांगत असे की एक बातमी टाईप केली की ताबडतोब तिची प्रिंट काढा. दुसरी केली, तिची प्रिंट काढा. सगळ्या बरोबर काढायला थांबू नका. कारण वीज गेली वा संगणक बिघडला तर काहीही करू शकणार नाही.
एकदा सकाळच्या ड्युटीवर दोन न्यूज रीडर होते. त्यांनी बातम्या तयार करायला सुरूवात केली. ७:२५ चं प्रादेशिक बातमीपत्र सुरळीतपणे झालं. मी घरी होतो. संध्याकाळची ड्युटी होती. रविवार होता तो. दहा वाजण्याच्या सुमारास एका वृत्तनिवेदकाचा फोन आला. तो धापाच टाकत होता. काय झालं रे, असं विचारायच्या अगोदर कसा पेचप्रसंग उद्भवला तो त्याने कथन केला. “आम्ही सगळे प्रिंट्स शेवटी काढुया म्हणून थांबलो. ८:४० चं बुलेटीन. साडेआठ वाजता प्रिंट काढायला सुरूवात केली. एकच पान छापून आलं. दुसरं आत अडकलं आणि इथंच सर्व ताण सुरू झाला. अनेक प्रयत्न केले. पण कसेच प्रिंट येईना. एसी कक्षात घाम आला होता. नंतर दुसऱ्या न्यूज रीडरने युक्ती लढवली. त्याने पेन ड्रायव्हवरून सर्व मजकूर आपल्या लॅपटॉपमध्ये घेतला. मला शांत थंड राहायला सांगितलं. तरीही होणार कसं, हा ताप होताच. दोघेही पळत स्टुडिओत पोहचलो. त्यानं लॅपटॉप उघडला. सुदैवाने ते देवनागरी सॉफ्टवेअर त्याच्यात होतं. बातम्यांची वेळ सुरू झाली. मी बुलेटीन वाचलं. पण काळीज धपाधपा धडधडत होतं. वाचनावर परिणाम झालाच. तुम्ही कायम सांगत होता, तेव्हा अतिशयोक्ती वाटत होती. आम्ही दुर्लक्ष केलं. आज अनुभवात भाजून निघाल्यावर हे व्रण कायम आठवणीत राहतील.”
मी फक्त ऐकून घेतलं. शांतपणे.
अशा अनेक घटना न्यूज कक्षात होतात. वेळ अगदी कमी पण अचूकता सांभाळावी लागते. काळजी घ्यावी लागते. अशाच आणखीन एका रविवारची गोष्ट. मी नाश्ता करायला बसलो होतो. माईने इडली व सांबार केले होते. शेवग्याच्या शेंगेचा तुकडा उचलणार मात्र, ऑफिसातून फोन खणखणला. संपादक प्रचंड चिंतेत वाटले. साडेआठ वाजले होते. “उडाला उडाला…” असं ते किंचाळल्यासारखे ओरडत होते. मी म्हटलं, “कोण उडाला? काय झालं?” “अहो, बुलेटीनचा संपूर्ण मजकूर सेव्ह करूनही गेला. उडाला. आता काय करू?” मी डोकं थंड ठेवायची विनंती दोघांनाही केली. काही युक्त्या दिल्या. तडकाफडकी हे हे करा. हेडलायन्स लिहा अगोदर असं सांगितलं. त्यांना थोडा दिलासा मिळाला. पण पराकोटीची भंबेरी कशी उडते त्याचा धडा त्यांना मिळाला. एकेक बातमी सेव्ह करा, प्रिंट करा नाहीतर हाताने लिहून काढा ना... काहीही उडणार नाही!
रूचकर इडली खाताना व्यत्यय आणला खरा!!!
- मुकेश थळी
(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक,कोशकार असून
आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)