अखेर मगोपचा काँग्रेस प्रवेश बारगळला…

गोवामुक्तीनंतर झालेल्या पहिल्यावहिल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय मतदारांनी काँग्रेस उमेदवारांची जी अवहेलना केली होती, त्याचा बराच धसका काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला होता. त्यामुळे उरलीसुरली इज्जत राखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक लढवू नये, असा निर्णय पक्षाने घेतला होता.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
15th December, 12:06 am
अखेर मगोपचा काँग्रेस प्रवेश बारगळला…

जनमत कौलात महाराष्ट्रात विलीनीकरणाचा प्रस्ताव बहुमताने फेटाळून लावल्याने, दोन्ही गट आनंदित दिसत होते. विलीनीकरण प्रस्ताव फेटाळला गेला म्हणून विरोधक खूश होणे स्वाभाविक होते पण आमचे भाऊच मुख्यमंत्री होणार म्हणून विलीनीकरणवादीही खूश होते. त्यामुळे दोन दिवसांचे रुसवे-फुगवे संपल्यावर दोन्ही गटांचे नेते नेहमीप्रमाणे कामाला लागले. जनमत कौल निकाल लागल्यानंतर लगेच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. २८ मार्च १९६७ ही तारीख मुक्रर करण्यात आली. झाले गेले विसरून सर्व राजकीय नेते लगेच कामाला लागले. युगोपची दोन शकलं झाली होती.

जनमत कौलात विलीनीकरण की संघप्रदेश हे दोन पर्याय दिले होते. युगो नेते लोयाला आल्वारो फुर्तादोंना हा पर्याय मान्य नव्हता. विलीनीकरण की घटक राज्य हा पर्याय हवा असे त्यांचे मत होते. युगो नेते डॉ. जॅक सिक्वेरांनी फुर्तादोंचे म्हणणे विचारात न घेता केंद्र सरकारचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे फुर्तादो नाराज झाले होते. हा वाद वाढतच गेला आणि निवडणूक जाहीर झाली तेव्हा फुर्तादो यांनी आपली वेगळी चूल मांडली. पहिल्या विधानसभा निवडणुकीत १२ जागा जिंकलेल्या युगोपने काँग्रेसबरोबर निवडणूक युती करण्याचा प्रस्ताव पुढे केला. पहिल्या निवडणुकीत युगोपने ज्या १२ जागा जिंकल्या होत्या, त्या सगळ्या वगळून इतर जागांबाबत जागा वाटप करुया असा प्रस्ताव युगोने काँग्रेसला दिला होता. हा प्रस्ताव घेऊन गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम काकोडकर दिल्लीला गेले तेव्हा श्रेष्ठींनी त्यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. 

गोवामुक्तीनंतर झालेल्या पहिल्यावहिल्या विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय मतदारांनी काँग्रेस उमेदवारांची जी अवहेलना केली होती, त्याचा बराच धसका काँग्रेसश्रेष्ठींनी घेतला होता. त्यामुळे उरलीसुरली इज्जत राखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक लढवू नये असा निर्णय पक्षाने घेतला होता. त्यामळे युगोपकडे निवडणूक समझोता करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला निवडणूक लढवायची असल्यास अपक्ष म्हणून लढविण्याची मुभा श्रेष्ठींनी दिली होती. पण तसे धाडस कोणी केलं नाही. पहिल्या निवडणुकीत मगोपने प्रजा समाजवादी पक्षाकडे युती केली होती. प्रजा समाजवादी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार भाऊसाहेबांनी प्रजा समाजवादी पक्षाचे पीटर आल्वारीस यांना उत्तर गोवा लोकसभा आणि गजानन रायकर व जयसिंगराव व्य. राणे यांना विधानसभा तिकीट देऊन त्यांना निवडूनही आणले होते. मगोपच्या पाठिंब्यावर निवडून येऊनही पीटर आल्वारीस यांनी लोकसभेत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली होती. त्यामुळे मगोप सरकारचे नुकसान झाले आहे असे भाऊसाहेबांचे म्हणणे होते. या सगळ्या गोष्टी विचारात घेवून प्रजा समाजवादी पक्षाबरोबरची युती चालू न ठेवण्याचा निर्णय मगोपने घेतला. 

सत्तरीचे माजी आमदार जयसिंगराव व्यंं. राणे मगोपतर्फे निवडणूक लढविण्यास तयार असल्यास त्यांना तिकीट देण्याची तयारी भाऊसाहेबांनी दाखविली. मात्र राणे यांनी त्यास नकार देत समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढविली. मगोपने स्वबळावर स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. गोवा विधानसभेच्या या दुसऱ्या निवडणुकीत मगोप, युगोप (सिक्वेरा गट), युगोप (फुर्तादो गट) आणि प्रजा समाजवादी पक्ष असे चार पक्ष निवडणूक आखाड्यात उतरले होते. मगोपने गोव्यातील २८ मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते तर युगो (सिक्वेरा गट) २८ उमेदवार उभे केले होते. युगो (फुर्तादो गट) ६ उमेदवार उभे केले होते. प्रजा समाजवादी पक्षाने ५ उमेदवार उभे केले होते. त्यात माजी आमदार जयसिंगराव व्यंं. राणे यांचाही समावेश होता. अ‌त्यंत अटीतटीच्या अशा या निवडणुकीत मगोपला १६ जागा मिळाल्या तर युगोला १२ जागा मिळाल्या. पहिल्या निवडणुकीत मगोला १२ जागा मिळाल्या होत्या व मगोच्या पाठिंब्यावर प्रजा समाजवादी पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते. दुसऱ्या निवडणुकीतही पहिल्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली होती. प्रजा समाजवादी पक्ष तसेच युगो (फुर्तादो गट) यांना मतदारांनी पूर्णपणे झिडकारले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब बांदोडकरांचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथविधी झाला, ऑथनी डिसोझा व गोपाळराव मयेकर यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून तर अच्युत उसगावकर यांचा राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. अॅड. गोपाळ आपा कामत स‌भापती, तर मंजू गांवकर यांची उपसभापती म्हणून निवड झाली. गोवा विधानसभेत प्रतिनिधित्व नसलेल्या घटकांचे दोन प्रतिनिधी विधानसभेत नियुक्त करण्याचा अधिकार गोवा सरकारला होता. तेव्हा अनुसूचित जातीचे शांताराम कांबळे आणि अनुसूचित जमातीचे जिवा गांवकर यांना आमदार म्हणून नियुक्त करण्यात आले. विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा यांनी या दोन आमदारांच्या नियुक्तीला तीव्र आक्षेप घेतला. मगोप सरकारला अनुसूचित जातीजमातींचा कोणताही कळवळा नसून आपले सरकार स्थिर करण्यासाठी या दोघांची आमदार म्हणून नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केला. या नियुक्तीचा निषेध करण्यासाठी त्यांनी कामकाजावर बहिष्कार जाहीर करून सभात्याग केला. अनुसूचित जातीजमातींच्या आमदारांची नियुक्ती केल्याबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारचे अभिनंदन करायला पाहिजे होते. मात्र समाजातील कमकुवत घटकांच्या नियुक्तीला विरोध करुन आपल्या मनाचा कोतेपणा दाखवून दिला.

भाऊसाहेब बांदोडकरांना काँग्रेसबद्दल सुरुवातीपासून आत्मीयता होती. भाऊसाहेब दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मगोप काँग्रेसमध्ये विलीन करावा असा प्रस्ताव पुढे आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई यांनी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांना दिल्लीला पाचारण केले. मगोप काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला. मात्र गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब बांदोडकरांची नियुक्ती करण्यात यावी एवढीच रास्त अपेक्षा भाऊसाहेबांनी व्यक्त केली. गोवामुक्तीनंतर गोवा प्रदेश काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अध्यक्ष बनलेल्या पुरुषोत्तम काकोडकरांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मगोपचे आमदार दत्ताराम चोपडेकरांनी मगोपच्या विलीनीकरणाला विरोध दर्शविला. या विषयावर चर्चा करण्यासाठी ६ ऑगस्ट १९६७ रोजी मगोप कार्यकारिणीची बैठक झाली. गोवा प्रदेश काँग्रेसची सूत्रे बांदोडकरांकडे दिल्याशिवाय मगोप काँग्रेसमध्ये विलीन न करण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला. पुरुषोत्तम काकोडकरांनी त्याला सर्वशक्तीनिशी विरोध केला. त्यामुळे अखेर मगोपचा काँग्रेस प्रवेश बारगळला.

पहिल्या मंत्रीमंडळात मंत्री असलेले शिरोड्याचे आमदार वि. सु. करमलींना दुसऱ्या मंत्री मंडळात स्थान मिळाले नव्हते. आपल्याला मंत्रीमंडळात न घेतल्याने करमलींना नैराश्याने ग्रासले होते. आपल्याला मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न करण्यासाठी ते मुंबईला जाऊन काही राजकीय नेत्यांना भेटले पण काही लाभ झाला नाही. अत्यंत निराशाजनक अवस्थेत त्यांनी मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेने अख्खा गोवा हळहळला.

विठ्ठल सुब्राय करमली हे उच्चविद्याविभूषित सद्गृहस्थ होते. १९६३मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत ते कुडचडे मतदारसंघातून मगोपचे आमदार म्हणून निवडून आले होते. युगोपचे उमेदवार शेख कादर यांचा त्यांनी सुमारे ५०० मतांनी पराभव केला होता. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकरांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. करमलींना ३०४२ तर काकोडकरांना अवघी १६०१ मते मिळाली होती. युगोचे शेख कादर यांना २५६९ मते मिळाली होती. पहिल्या मंत्रीमंडळात करमलींना मंत्रीपद मिळाले होते. १९६७ मध्ये झालेल्या दुसऱ्या निवड‌णुकीत करमलींना शिरोडा मतदारसंघातून तिकीट देण्यात आली. या निवडणुकीत त्यांना ४५७१ मते मिळाली तर युगो उमेदवार फ्रान्सीस फर्नांडीस यांना केवळ १२९४ मते मिळाली. त्यामुळे आपल्याला परत मंत्रीपद मिळणार असे त्यांना वाटले असणार. यावेळी गोपाळराव मयेकर व अच्युत उसगावकरांना मंत्रीपद देण्यात आले. आपल्याला मंत्री पद नाकारल्याने आत्महत्या करणारे देशातील हे एकमेव राजकारणी असतील!


-गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)