मोहाली : पंजाबमधील मोहाली येथे शनिवारी संध्याकाळी कोसळलेल्या बहुमजली इमारतीतून रविवारी सकाळी आणखी एक मृतदेह सापडला आहे. एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक सुमारे १८ तासांपासून बचाव कार्यात गुंतले आहे. काल रात्री मातीच्या ढीगाऱ्यातून एका मुलीची सुटका करण्यात आली. मात्र, रुग्णालयात तिचा आज सकाळी मृत्यू झाला.
एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अजूनही ३ जण अडकून पडलेत.आज सकाळी डॉक्टरांचे पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी इमारत कोसळली आहे त्या ठिकाणी सांडपाणी साठले आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा जीव वाचण्याची फारशी आशा नाही.
या दुर्घटनेतून बचावलेल्या जिम ट्रेनरने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ३ मजल्यांवर जिम आहेत आणि उर्वरित २ मजल्यांवर लोक भाड्याने राहत होते. रात्री एक महिला तिच्या पतीला शोधण्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. तिचा पती अभिषेक येथे जिम करण्यासाठी आला होता. अपघात झाल्यापासून त्याचा फोन बंद होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सापडलेला एक मृतदेह हा अभिषेकचा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सदर घटना गुरुद्वारा सोहाना साहिबजवळ दुपारी ४.३० वाजता घडली. ही इमारत सुमारे १० वर्षे जुनी होती. या शेजारीच तळघराचे खोदकाम सुरू होते, त्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ती कोसळली. साहिबजादा अजित सिंग नगर पोलिसांनी शनिवारी रात्री सोहाना पोलीस स्टेशनमध्ये इमारत मालक परविंदर सिंग आणि गगनदीप सिंग यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.