पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर मडगाव वेस्टर्न बायपास सुरु करण्याची मागणी
मडगाव : न्यायालयाची देखरेख असल्याचे कारण देत पर्यावरणपूरक गोष्टींकडे दुर्लक्ष करत वेस्टर्न बायपास पूर्णत्वास आलेला आहे. मात्र, आता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मंत्र्यांना वेळ नसल्याने या मार्गाच्या उद्घाटनाला विलंब केला जात आहे. आता विनाकारण विलंब करणे हा न्यायालयाचा अवमान नाही का, असा सवाल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
मडगाव वेस्टर्न बायपासचे ११.९ किमी अंतराचे काम आता पूर्णत्वास आलेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उस्स्थितीत १९ डिसेंबर रोजी या महामार्गाचे उद्घाटन होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती व त्यानुसार उर्वरित कामांना वेग देण्यात आलेला होता. मात्र, वेस्टर्न बायपास पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटन केले जात नाही व महामार्ग बंद करुन ठेवण्यात आलेला असल्याने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी टीका केलेली आहे.
चोडणकर यांनी सांगितले की, सुरावली ते बाणावलीपर्यंतचा वेस्टर्न बायपास मार्ग अनेक दिवसांपासून पूर्ण झालेला आहे. पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याने याच्या शुभारंभाला विलंब होत आहे. मात्र, याच मंत्रालयाकडून न्यायालयाची वेस्टर्न बायपासच्या कामांवर देखरेख असल्याचे कारण देत पर्यावरणीय बाबी व निर्माण होणार्या पूर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत प्रकल्प मार्गी लावण्याची घाई केलेली होती. मग आता कोणतेही कारण नसताना मार्ग पूर्णत्वास आलेला असताना त्यावर बॅरिकेटस ठेवून मार्ग बंद करुन ठेवणे व शुभारंभ न करणे हा न्यायालयाचा अवमान होत नाही का असा सवाल चोडणकर यांनी केलेला आहे.
रज्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. विविध देशी परदेशी पर्यटक राज्यात दाखल झालेले आहेत. अशावेळी रस्ते सुरक्षिततेचा विचार करुन मडगाव वेस्टर्न बायपास सुरु होण्याची गरज होती. यामुळे वाहतूक कोंडींचे प्रकार कमी झाले असते पण सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे अजूनही हा महामार्ग पूर्ण होऊनही वाहतुकीसाठी बंद ठेवलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत महामार्गाचा रखडलेला शुभारंभ करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.