कारवार अबकारी विभागाकडून दोघांना अटक : ६५ लिटर दारू जप्त
कारवार : वाहनांना चोरकप्पे बनवून तसेच चोरट्या मार्गाने दारू तस्करी होणे हे सामान्य बाब आहे, पण चक्क पायांना, पोट आणि कंबरेला सेलोटेपच्या साहाय्याने दारूच्या बाटल्या बांधून तस्करी करणारा प्रकार कारवार अबकारी विभागाने उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी गोकर्ण येथील राजन पिळवे व प्रवीण गोकर्ण यांना अटक केली अाहे. त्यांनी आपल्या शरीरावर बांधून आणलेली एकूण ५२ हजार रुपयांची ६५ लिटर दारू जप्त केली आहे.
गोव्यातून कारवारात येणाऱ्या एका खासगी प्रवासी बसमधून प्रवासी बनून दोघे ही दारूची तस्करी करीत होते. गोव्यातील स्वस्त दारू आणून ते येथे विक्री करायचे. याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती, त्यानुसार गोव्यातून आलेल्या जी. ए. ०३ एक्स ०५९९ या खासगी बसमधून दोघेजण दारू तस्करी करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार, कारवार अबकारी विभागाने ही कारवाई केली आहे.