दुचाकी अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, एकास अटक

वोलतार बाणावली येथील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd December, 11:58 pm
दुचाकी अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू, एकास अटक

मडगाव : वोलतार बाणावली येथे होंडा शाईन दुचाकीची धडक बसून होंडा अ‍ॅक्टिव्हाचा चालक राऊल रिबेलो (रा. माजिलवाडा, बाणावली) याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान गोमेकॉत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी होंडा शाईन दुचाकीचालक इम्रान नन्हे खान (रा. परसुरावली, कोलवा) याला कोलवा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

संशयित इम्रान खान हा आपल्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी घेऊन बाणावली येथून वार्काच्या दिशेने जात असताना २० डिसेंबर रोजी अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जाताना होंडा शाईन गाडीची धडक अंतर्गत रस्त्याकडे वळत असणार्‍या राऊल रोझारिओ रिबेलो याच्या गाडीला बसली. यात राऊल गाडीसह रस्त्यावर पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते. जखमी राऊल याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकीचालक इम्रान खान याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली. त्यानंतर जामिनावर त्याची सुटकाही करण्यात आली. याप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजू वंतामुरी पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा