जखमी झालेला संदेश पाडलोसकरवर गोमेकॉत उपचार सुरू
म्हापसा : मरड, म्हापसा येथील मयुरा हॉटेलच्या रिसेप्शसनिस्टवर सुरी हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपी स्वानंद कसबे (२९, रा. गिरी व मूळ पुणे-महाराष्ट्र) यास सात दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
ही घटना गुरूवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास घडली होती. संशयिताला पोलिसांनी काही तासांत पकडून अटक केली होती. शुक्रवारी संशयित स्वानंद कसबे यास म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या खुनी हल्ल्यात जखमी झालेला संदेश पाडलोसकर (रा. साळ डिचोली) याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी १९ रोजी संशयित स्वानंद कसाबे हा आपल्या प्रेयसीला घेऊन हॉटेलवर आला होता. रुममध्ये गेल्यावर तिथे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला पोहोचला व संशयिताने त्या युवतीला मारहाण करण्यास सुरूवात केली.
त्यामुळे ती रुममधून बाहेर पडत हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरवर मदतीसाठी आली. संशयित प्रियकर आपल्याला त्रास देत असून मारहाण करत असल्याचे तिने सांगितले असता हॉटेलच्या दोघा कर्मचाऱ्यांनी त्या युवतीला स्टाफच्या कॅबिनमध्ये लपविले.
प्रेयसी रूममधून पळाल्याने चिडलेला संशयित हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरवर आला. तिथे त्याने युवतीची विचारपूस करत तिची शोधाशोध केली. परंतु ती सापडली नसल्याने स्वानंद तावातावाने हॉटेलमधून बाहेर पडला व काहीवेळाने पुन्हा हॉटेलवर परतला.
संध्याकाळी ड्युटीवर असलेल्या संदेश पाडलोस्कर या रिसेप्शनिस्टला स्वानंदने त्या युवतीबाबत विचारले. त्याने समपर्क उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या स्वानंदने संदेशवर सुरीने हल्ला चढवत त्याचा चेहरा, मान आणि पोटावर सुरीचे सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या हल्ल्यात संदेश रक्तबंबाळ झाल्याने त्याला सहकाऱ्यांनी तातडीने जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून संदेशला गोमेकॉत पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करत संशयिताला काही तासात गिरी येथून अटक केली.
तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू
संशयितासोबत हॉटेलवर आलेल्या त्या युवतीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. स्वानंदचे लग्न झाले असून तो आपल्या कुटुंबासमवेत गिरी येथे वास्तव्यास असून तो व्यवसायाने वाहन चालक आहे.