बार्देश : सुरीहल्ल्यात म्हापशातील हॉटेलचा रिसेप्शनिस्ट जखमी

संशयितास अटक : युगुलाचा वाद अंगलट

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th December, 10:36 pm
बार्देश : सुरीहल्ल्यात म्हापशातील हॉटेलचा रिसेप्शनिस्ट जखमी

म्हापसा : मरड-म्हापसा येथील मयुरा हॉटेलच्या रिसेप्शनिस्ट संदेश पाडलोसकर (रा. साळ डिचोली) याच्यावर युवकाने सुरीहल्ला केला. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी सुहानंद कसबे (३५, रा. गिरी, मूळ पंढरपूर-महाराष्ट्र) याला अटक केली. संशयित हॉटेलवर प्रेयसीसोबत आला होता.       

ही घटना गुरुवार दि. १९ रोजी घडली. संशयित आपल्या प्रेयसीसोबत या हॉटेलच्या रुममध्ये थांबला होता. रुममध्ये काही काळ थांबल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर ही युवती खाली हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडे आली. ती त्याला काहीतरी सांगत असल्याचे गृहित धरुन प्रियकराने रिसेप्शनिस्ट संदेश पाडलोसकर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर रागाच्या भरात संशयिताने संदेश याच्यावर सुरीहल्ला केला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. संदेशच्या पोटावर व चेहऱ्यावर सुरीचे वार झाल्याने दुखापत झाली आहे. यानंतर संशयित प्रेयसीसोबत पळून गेला. तो विवाहित असून बायकोसोबत गिरी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्याला असतो. त्याची प्रेयसी मूळ नेपाळची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रेयसीला घेऊन संशयित घटनास्थळी हॉटेलवर गेला होता.  घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्यासह सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताची ओळख पटल्यानंतर त्याची शोधाशोध करून खुनी हल्ल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.       

दरम्यान, जखमी संदेश पाडलोसकर याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा