गॅम्बलिंग ॲपची जाहिरात करणे पडले महागात. पुढील काळात अनेक मोठ्या सुपरस्टार्सना ईडी चौकशीसाठी पाचारण करू शकते.
नवी दिल्ली : मॅजिक विन गॅम्बलिंग ॲपशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चित्रपट अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची चौकशी केली. ही चौकशी कधी झाली याची नेमकी माहिती समोर आली नाही मात्र हे प्रकरण गुरुवारी उघडकीस आले.
प्राप्त माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्री मॅजिक विन गॅम्बलिंग ॲपच्या प्रमोशनशी संबंधित होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, तपासात दोन्ही अभिनेत्री दोषी आढळल्या नाहीत. या ॲपचा मालक पाकिस्तानी नागरिक असल्याचीही माहिती समोर आली आहे, तर काही भारतीय नागरिक दुबईतून ते ऑपरेट करत होते
मॅजिक विन ॲपने पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे. तसेच याद्वारे ऑनलाइन सट्टेबाजीही केली जात होती. समोर आलेल्या माहितीनुसार, मल्लिका शेरावतने ईमेलद्वारे ईडीला आपले उत्तर पाठवला होते, तर पूजा बॅनर्जी चौकशीसाठी ईडीच्या अहमदाबाद कार्यालयात पोहोचली होती. ईडीने दोन मोठ्या सेलिब्रिटींनाही समन्स पाठवले आहे.
याशिवाय पुढील आठवड्यात ७ बड्या सेलिब्रिटी, टीव्ही कलाकार आणि कॉमेडियन यांनाही समन्स पाठवले जाऊ शकते. या प्रकरणी गेल्या ६ महिन्यांत ईडीने देशभरात सुमारे ६७ ठिकाणी छापे टाकले आहेत.
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ॲपच्या लॉन्च पार्टीला उपस्थित होते. या लोकांनी मॅजिक विनच्या प्रमोशनसाठी व्हिडिओ आणि फोटो शूट केले होते आणि ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअरही केले होते, अशी माहिती ईडीने मंगळवारी पत्रकारांना दिली होती.