तुरूंग महानिरीक्षकांची घोषणा : कारागृहात व्यायाम शाळेची व्यवस्था
म्हापसा : कोलवाळ कारागृहाच्या आवारात एक पेट्रोल पंप चालवण्याचा तुरूंग प्रशासनाचा मानस आहे. राज्य सरकारकडून यास मान्यता मिळाली असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यावर काम करत आहे. हा पेट्रोल पंप पूर्णपणे महिला वर्ग चालवतील, अशी घोषणा तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी केली.
गोवा मुक्तिदिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. १९ रोजी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायाम शाळेचा शुभारंभ केल्यानंतर तुरूंग महानिरीक्षक बोलत होते.
ही व्यायामशाळा क्रीडा-युवा व्यवहार संचालक निधीतून साकारली आहे. या व्यायामशाळेमुळे तक्रारागृहातील २५० कर्मचाऱ्यांना मोफत व्यायामाची सुविधा प्राप्त झाली आहे.
व्यायामशाळा उभारण्यासाठी मुख्यामंत्री, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक तसेच तुरुंग महानिरीक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस खूप महत्त्वाची असते. तसेच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना या व्यायामशाळेचा खूप फायदा होईल, अशी प्रतिक्रिया तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांनी दिली.
यावेळी सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर तसेच उपअधीक्षक अनिल गावकर आदी उपस्थित होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात या व्यायाम शाळेचा नक्कीच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मसाला बनविणाऱ्या युनिटचे उद्घाटन
कारागृहात मसाला बनविणाऱ्या युनिटचे उद्घाटन तुरुंग महानिरीक्षक ओमविर सिंग बिश्नोई यांच्या हस्ते करण्यात आले. यातून कारागृहातील महिला कैद्यांना रोजगार मिळेल. हा मसाला सध्या कारागृहातील स्वयंपाकगृहात वापरला जाईल. कालांतराने हा मसाला सरकारी कॅटीन्स तसेच इतरत्र पुरवठा करण्याचा मानस आहे. तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासागत मंडळाच्या शिफारीनुसार ५० महिला कैद्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह कारागृहात तयार केले आहे.