१८ डिसेंबरपर्यंत ८२६ गुन्हे दाखल : गंभीर गुन्ह्यांचा ९५.३८ टक्के यशस्वी तपास
मडगाव : दक्षिण गोव्यात १ जानेवारी ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत दक्षिण गोवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमाखाली ८२६ विविध गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७२१ गुन्ह्यांचा छडा लावून संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे तपास यशस्वी होण्याचे हे प्रमाण ८७.२९ टक्के इतके राहिले आहे. खून, बलात्कार व इतर गंभीर गुन्ह्यांचा ९५.३८ टक्के छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे गोवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. तर, घरफोड्या, वाहन चोऱ्या व अन्य प्रकारचा चोर्यांचा तपास लावण्याचे प्रमाण मात्र ६२.९४ टक्के एवढे आहे.
राज्यात वरील कालावधीत १३ खून, खुनाचा प्रयत्न केल्याची १० तर बलात्कारांची ३९, सदोष मनुष्यवधाची ३ अशी मिळून ६५ गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील तीन बलात्कार प्रकरणे वगळता इतर सर्व गुन्ह्यांचा १०० टक्के तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दरोड्याची तीन प्रकरणे, ५ जबरी चोरी, भरदिवसा १६ चोऱ्या, रात्रीच्या वेळी ४३ चोऱ्या, घरफोडीच्या १६, ४३ वाहन चोऱ्या, ८ सोनसाखळी हिसकावणे तर मोबाईल व अन्य प्रकारच्या ३६ चोऱ्या मिळून वरील कालावधीत १७० चोऱ्यांची नोंद झाली आहे. यातील ५ जबरी चोरी, भरदिवसा १२ चोऱ्या, रात्रीच्या वेळी २२ चोऱ्या, ११ घरफोडी, २३ वाहन चोरी, चेन हिसकावणे ५ तर मोबाईल व अन्य प्रकारच्या २६ चोऱ्या मिळून वरील कालावधीत १०७ चोऱ्यांचे तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या प्रकरणांचा तपास लावण्याचे प्रमाण ६२.९४ टक्के एवढे होते. त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यामुळे तपासाची टक्केवारी कमी झाली आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस स्थानकाच्या वाहनांमार्फत तसेच स्थानिक गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची वेळोवेळी चौकशी करण्यात येत आहे. भाडेकरू तसेच इतर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.
वरील कालावधीत ६० फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यातील ५३ गुन्ह्यांचा तपास लागला. विश्वासघात केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील सर्व गुन्ह्यांचा तपास लावला आहे. या काळात मारहाण करणे, जखमी करणे अशी १०७ प्रकरणे नोंद असून यातील १०२ प्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर, ३५ अपहरण प्रकरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील २९ अपहरण प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त भारतीय न्याय संहिता (बीएनएस) व भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमाअंतर्गत १३९ गुन्ह्यांची नोंद झाली आहेत. यातील १२४ गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
वर्षभरात बलात्काराची ३९ प्रकरणे
गोवा हे पर्यटन स्थळ असून असून देशीविदेशी पर्यटक येत असतात. पर्यटन व्यवसाय सुधारत असताना दक्षिण गोव्यातील गेल्या साडेअकरा महिन्यांत ३९ लैंगिक अत्याचाराची प्रकरणे घडणे व १३ खून, १० खुनाचा प्रयत्न करण्याचे प्रकार घडणे ही बाब चिंतादायक आहे. मात्र, पोलिसांना तपासकामानंतर खून, खुनाचा प्रयत्न व सदोष मनुष्यवधप्रकरणी १०० टक्के प्रकरणांत यश आले. तर, बलात्काराच्या ३६ प्रकरणांत संशयितांना पकडण्यात यश मिळाले आहे.
२१९ अपघातांत ८२ जणांचा मृत्यू
दक्षिण गोव्याच्या विविध स्थानकांत अपघातांची एकूण २१९ प्रकरणे मागील साडेअकरा महिन्यांत नोंद आहेत. अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी ८२ प्रकरणे नोंद असून ८१ प्रकरणांत संशयितांना अटक केली. इतर १३७ अपघाताची प्रकरणे घडली असून त्यातील १३२ प्रकरणांत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.