वाळपई पोलिसांकडून तीन दिवसांत अनेक घरांची झाडाझडती

संशयिताकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने पोलिसांकडून तपासाला गती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th December 2024, 12:17 am
वाळपई पोलिसांकडून तीन दिवसांत अनेक घरांची झाडाझडती

वाळपई : पाटवळ सत्तरी या ठिकाणी रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. वाळपई पोलिसांनी सदर प्रकरणी तपासाला गती दिली आहे. संशयितांच्या चिंचमळ येथील घराची व सभोवतालची झाडाझडती सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये शंभरपेक्षा जास्त घरांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे अनेकांचे जबाब नोंद करून घेण्यात आले.

चार दिवसांपासून सदर प्रकरणाच्या तपासाला गती देताना पोलिसांनी अनेकांच्या जबाब नोंदविले आहेत. यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडलेले आहेत. येणाऱ्या काळात अनेक जणांना या प्रकरणांमध्ये अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तपासाला गती देण्यासाठी वनखात्याची मदत घेण्यात येणार असल्याचे पोलीस यंत्रणेने स्पष्ट केले आहे.

वाळपई पोलिसांनी संशयितांच्या चिंचमळ माऊस या भागामध्ये कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात येत आहे. या भागांमध्ये आक्षेपार्ह वस्तू असल्याचा पोलिसांना सुगावा लागला आहे. यामुळेच सदर प्रकारचे ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १०० पेक्षा जास्त घरांची झडती घेण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पाच तुकड्या तायर केल्या आहेत. वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करीत असल्याचे समजते.

घरांतील अनेकांचे जबाब घेण्यात येत आहेत. यातून काही महत्त्वाचे पुरावे आढळतात का? या संदर्भातही तपासणी करण्यात येत आहे.

बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची पडताळणीही सुरू केली आहे. त्यांना खोली उपलब्ध करुन दिलेल्या घरमालकावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सदर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या परप्रांतीय राहत आहेत. त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर कारवाई करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

परप्रांतीयांचे बेकायदेशीररित्या वास्तव्य

सदर भागात काही घरांमध्ये परप्रांतीय बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याची माहिती हाती आलेली आहे. या ठिकाणी परप्रांतीयांची मोजकीच घरे होती. मात्र, दोन वर्षांत या घरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या घरांना स्थानिक पंचायतीकडून घर क्रमांक देण्यात आले आहेत. याबाबतीतही पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्या आधारकार्डची शहानिशा पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा