सासष्टी : हॉटेलच्या खोलीतून महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st January, 03:20 pm
सासष्टी : हॉटेलच्या खोलीतून महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

मडगाव : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण गोव्यातील वार्का येथील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या महिलेचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला गेले. याप्रकरणी मुंबई येथील रहिवासी निवेदिता शंकर टी. एम. (३५) यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक दाखल झालेले आहेत. दक्षिण गोव्यातील किनार्‍यांवरही पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी आहे. यातच आता पर्यटकांच्या वस्तू चोरुन चोरट्यांचा फटका बसत आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली मुंबई येथील निवेदिता शंकर टी. एम. या पर्यटनासाठी गोव्यात आल्या होत्या. बाणावलीतील वार्का येथील महिंद्रा रिसोर्टमध्ये त्यांचे वास्तव्य होते. याच खोलीतील बाल्कनीचा दरवाजा उघडून चोरट्याने निवेदिता यांनी खोलीत ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र व रोख ११ हजार रुपये पळवले.

ही चोरीची घडना २९ डिसेंबर रोजी घडली होती. शोधाशोध करुनही मुद्देमाल न मिळाल्याने निवेदिता यांनी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. त्यानुसार कोलवा पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे. कोलवा पोलिस निरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए. टी. कृष्णा याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.