बार्देशः तक्रारदाराचा साक्षीदाराला ओळखण्यास नकार

पोलीस मारहाण प्रकरणातील संशयित निर्दोष

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st January, 11:45 pm
बार्देशः तक्रारदाराचा साक्षीदाराला ओळखण्यास नकार

पणजी : कळंगुट परिसरात २०१० मध्ये सेवा बजावताना तिघा संशयितांनी पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी तक्रारदार उपनिरीक्षकाने न्यायालयात जबाब फिरविल्यामुळे न्यायालयाने संशयित मार्सीलो उर्फ कुकी राॅड्रिग्ज याला पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली, तर इतर दोघे संशयित अजूनही फरार आहेत. 

या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी २५ मे २०१० रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक महाबळेश्वर सावंत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदार उपनिरीक्षक सावंत २५ मे २०१० रोजी मध्यरात्री उमटावाडा - कळंगुट परिसरात सेवा बजावत होता. 

त्यावेळी मध्यरात्री १२.१० वाजता श्यामराॅक पब जवळ संशयित मार्सीलो उर्फ कुकी राॅड्रिग्ज, संदीप कुमार भुनिया आणि जनया उर्फ जाॅन फर्नांडिस या तिघांनी त्याला अडवले. तसेच त्याच्याशी हुज्जत घालत त्याला सेवा बजावण्यास मज्जाव केला.
संशयितांनी सावंत याच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार केला. 

या घटनेत तक्रारदार सावंत जखमी झाला. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी वरील तक्रारीची दखल घेऊन तिघा संशयितावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने ११ जून २०१० रोजी संशयित मार्सीलो उर्फ कुकी राॅड्रिग्ज याला तर १४ जून २०१० रोजी संदीप कुमार भुनिया आणि जनया उर्फ जाॅन फर्नांडिस या संशयितांना सर्शत जामीन मंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून १२ एप्रिल २०१३ रोजी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 

त्यात तक्रारदाराचे मित्र तथा प्रत्यक्षदर्शी आणि तपास अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून नमूद केले. त्यानंतर म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने १९ मार्च २०१८ रोजी आरोप निश्चित करून सुनावणी सुरू केली. न्यायालयात खटला सुरू असताना संदीप कुमार भुनिया आणि जनया उर्फ जाॅन फर्नांडिस हे दोघे संशयित फरार झाले. 

त्यामुळे न्यायालयाने संशयित मार्सीलो उर्फ कुकी राॅड्रिग्ज याच्याविरोधात खटला सुरू ठेवला. या प्रकरणी तक्रारदार उपनिरीक्षक महाबळेश्वर सावंत यांची उलटतपासणी झाली असता, त्याने प्रत्यक्षदर्शी तथा त्याच्या मित्राला ओळखण्यास नकार दिला. 

तसेच प्रत्यक्षदर्शींची उलटतपासणी केली असता, त्याने वरील प्रकाराबाबत माहिती नसल्याची साक्ष देत जबाब फिरविला. याची दखल घेऊन म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभूदेसाई यांनी संशयित मार्सीलो उर्फ कुकी राॅड्रिग्ज याची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली आहे.