संशयितांना ९ दिवसांची पोलीस कोठडी
म्हापसा : कळंगुट येथील समुद्रकिनार्यावरील मरीना बीच शॅकममध्ये बोल्लारवि तेजा (२८, रा. हैदराबाद-आंध्र प्रदेश) याच्या खून प्रकरणी सुमन सोनार (२८, रा. मूळ नेपाळ) या आणखी एका संशयिताला कळंगुट पोलिसांनी अटक केली. तर यापूर्वी अटक केलेल्या चारही संशयितांना न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून मयताचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.
याप्रकरणी बुधवारी सकाळी पोलिसांनी संशयित सुमन सोनार या शॅकच्या कामगाराला अटक केली. पर्यटकांना मारहाण प्रकरणात या संशयिताचा समावेश असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसानी ही कारवाई केली.
दरम्यान मयत बोल्लारवि तेजा याचे नातेवाईक बुधवारी गोव्यात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मयताच्या मृतदेहावर गोमेकॉमध्ये शवविच्छेदन झाले. त्यानंतर मयताचा मृतदेह घेऊन हे नातेवाईक हैदराबादला रवाना झाले.
मंगळवारी संशयित शॅक मालक आग्नेल सिल्वेरा (६४, रा. तिवायवाडा कळंगुट), शुबर्ट आग्नेल सिल्वेरा (२३), कामगार अनिल कमल बिस्ता (२४, रा. मूळ नेपाळ) व कमल सुनार (२३, रा. मूळ नेपाळ) या चौघांना अटक केली होती.
बुधवारी संशयितांना म्हापसा न्यायालयात हजर केले असता सर्वांना ९ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक करत आहेत.
पदार्थ ऑर्डरवरून झाला होता वाद
ही खूनाची घटना मंगळवारी उत्तररात्री १ च्या सुमारास घडली होती. जेवणाच्या पदार्थ ऑर्डर वरून मयत व त्याच्या मित्रांनी संशयितांशी वाद घातला होता. त्यावरून संशयितांनी मयत बोल्लारवि तेजा याच्यासह फिर्यादी स्पंदन बोल्लू, चैतन्य पानपडू, काईराम गिरीधर, दिपक सत्यनारायण, ज्योती चलांचलम्, दर्शनी नैदी व सत्यवर्षिनी नायडू या ग्राहक पर्यटकांना मारहाण केली. या मारहाणीत बोल्लारवि याच्या डोक्यावर दंडूक हाणल्याने तो गंभीर जखमी होऊन ठार झाला होता.