जुने गोवा पोलिसांची कारवाई
पणजी : तिसवाडी तालुक्यातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी २२ वर्षीय युवकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर १४ वर्षीय पिडीत मुलगी ३१ डिसेंबर रोजी आपल्या मित्राच्या घरी पार्टीसाठी गेली होती. ती घरी परत आली नसल्याने मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार १ जानेवारी रोजी सकाळी जुने गोवा पोलिसात दिली होती.
याची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिप्तराज गावडे यांनी मुलीच्या अपहरण प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला असता, मुलगी आणि तिच्याबरोबर एक युवक सापडला.
पोलिसांनी मुलीची सुटका करून त्या दोघांची वैद्यकीय चाचणी केली असता, १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सदर २२ वर्षीय युवकावर भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.