म्हापसा : निर्माणाधीन इमारतीच्या लोखंडी सळ्यांची चोरी; भंगारअड्ड्याच्या मालकासह चौघांना अटक

चोरीस गेलेल्या सुमारे १.८० लाखांच्या लोखंडी सळ्या भंगारअड्ड्यातून हस्तगत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st January, 04:38 pm
म्हापसा : निर्माणाधीन इमारतीच्या लोखंडी सळ्यांची चोरी; भंगारअड्ड्याच्या मालकासह चौघांना अटक

म्हापसा : हाऊसिंग-बोर्ड, कोलवाळ येथील हळर्णकर एज्यूकेशन सोसायटी या संस्थेच्या निर्माणाधीन इमारतीच्या ४०० लोखंडी सळ्या कापून चोरण्यात आल्या. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी करासवाडा येथील भंगारअड्ड्याच्या खताल बेपारी नामक मालकासह चौघांना अटक केली. चोरीस गेलेल्या १.८० लाखांच्या लोखंडी सळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  

अटक केलेल्या संशयितांमध्ये भंगार अड्ड्याचा मालक खतालसाब राजअहमद बेपारी (५४, रा. कासवाडा म्हापसा), त्याचे कामगार मंजा पंडप्पा लमाणी (३०, कुचेली व मूळ कर्नाटक), सुरेंद्र मनीराम जैसवाल (३२, करासवाडा व मूळ उत्तर प्रदेश) व शरुन रामकिशोर कुमार (२३ , दुर्गानगर कोलवाळ व मूळ उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

सदर चोरीची घटना गेल्या सप्टेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालवधीत घडली होती.  याप्रकरणी हळर्णकर एज्यूकेशन सोसायटीचे प्रतिनिधी नारायण डिचोलकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलीस चौकशीत या चोरीमध्ये करासवाडा  म्हापसा येथील भंगार अड्ड्याच्या मालकाचा सहभाग असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार संशयित खतालसाब याच्या भंगार अड्ड्याची पोलिसांनी झडती घेतली. तेव्हा येथे चोरीतील सळ्या सापडल्या.

सदर सळ्या जप्त करीत पोलिसांनी संशयित आरोपींविरूध्द भा.न्या. सं. कायद्यानुसार चोरीचा गुन्हा नोंदवला व चारही संशयितांना पकडून रितसर अटक केली. संशयित आरोपींना म्हापसा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.