वर्षभरात ३५ टक्के सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश

राज्यात एकूण ५६ सायबर गुन्हे दाखल; ४५ जणांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 12:05 am
वर्षभरात ३५ टक्के सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश

पणजी : पोलिसांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान राज्यातील ३५ टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. यादरम्यान राज्यात एकूण ५६ सायबर गुन्हे दाखल झाले होते. यातील १८ प्रकरणांचा छडा लावण्यात आला आहे. तर ३८ प्रकरणांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी एका वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या ४५ जणांना अटक केली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत सायबर गुन्ह्यात हडप केलेली रक्कम पुन्हा मिळवण्याचे प्रमाण वाढले आहे. गोवा सायबर पोलिसांनी अशा गुन्ह्यात हडपलेली रक्कम पुन्हा मिळवण्याची टक्केवारी ६ वरून ९.८ इतकी वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात अशी रक्कम परत मिळवण्यात गोवा सायबर पोलीस देशात पाचव्या स्थानी होते.
सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांनी वेळोवेळी जागृती केली आहे. यानुसार ‘सायबर सुरक्षा गोवा मंत्र’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात इंटरनेटवर ऑनलाईन असताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आली होती. या व अन्य उपक्रमांमुळे सायबर गुन्ह्यात लुबडल्या जाणारी रक्कम कमी झाली आहे. याआधी ही रक्कम महिन्याला ९ कोटी रुपये इतकी होती. आता ती ६ कोटी पर्यंत कमी झाली आहे.
सायबर विभागातील मनुष्यबळात वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन सरकारने सायबर पोलीस विभागात मनुष्य बळ वाढवले आहे. मे २०२४ मध्ये या विभागात २६ पोलीस कार्यरत होते. डिसेंबर २०२४ अखेरीस त्यात वाढ करून ते ४७ करण्यात आले आहेत. वर्षभरात ८०० पोलिसांना सायबर सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.      

हेही वाचा