युवतीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

युवकाला सात दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd January, 12:06 am
युवतीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार

पणजी : तिसवाडी तालुक्यातील १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय युवकाला अटक केली होती. त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

या प्रकरणी १४ वर्षीय मुलीच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार १ जानेवारी रोजी सकाळी जुने गोवा पोलिसात दिली होती. पीडित मुलगी ३१ डिसेंबर रोजी आपल्या मित्राच्या घरी पार्टीसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परत आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी सगळीकडे तिचा शोध घेतल्यानंतर पोलीस स्थानक गाठले. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. याची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिप्तराज गावडे यांनी मुलीच्या अपहरणप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला असता, मुलगी आणि तिच्याबरोबर एक युवक सापडला. पोलिसांनी मुलीची सुटका करून युवकाला ताब्यात घेतले. त्या दोघांची वैद्यकीय चाचणी केली असता, मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर २२ वर्षीय युवकावर भारतीय न्याय संहिता आणि गोवा बाल कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटक केलेल्या युवकाला गुरुवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.